मुंबई : मुंबईत झालेल्या जोरदार पावसानंतर लेप्टोस्पायरोसिस आजाराचा पहिला बळी गेला आहे. कुर्ला येथे राहणारा 15 वर्षीय भरत रमेश काळे याचा सोमवारी सायन इथल्या टिळक रुग्णालयात मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागात चिंतेचं वातावरण आहे.
कुर्ल्याच्या मिलननगर विभागात राहणारा भरत काळे हा तरुण शिवसृष्टी इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात फुटबॉल खेळण्यास गेला होता. परंतु मैदानात पाणी साचलं होतं. इथेच पायाला झालेल्या जखमेतून लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू त्याच्या शरीरात गेले. आठवडाभर या आजाराशी झुंजत असताना त्याचा सोमवारी सायन रुग्णालयात मृत्यू झाला.
साचलेल्या पाण्यात प्राण्यांची विष्ठा मिसळल्याने लेप्टोसायरोसिसच्या विषाणूंची वाढ होते. पायाला जखम असताना, अशाच प्रकारच्या मैदानातील साचलेल्या पाण्यात भरत फुटबॉल खेळण्यास गेला होता. याच पाण्यात त्याला लेप्टोस्पायरोसिसने जखडले.
भरत हा आई-वडिलांचा आधार होता. त्याला एक बहिणही आहे. भरत नुकताच नववीतून दहावीत गेला होता. वडील आजारी असल्याने बेरोजगार होते तर आई भारती घरकाम करुन घराचा गाडा हाकत होती. अशा परिस्थितीत भरत मोठा होऊन या घराचा आधार होणार होता. परंतु दुर्दैवाने लेप्टोस्पायरोसिसने त्याचा मृत्यू झाला.
महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे भरतचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसंच भरतच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, अशीही मागणी केली जात आहे.
मुंबईमध्ये जोरदार पावसाबरोबरच पावसाने आणलेल्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. लेप्टोस्पायरोसिससारख्या भयानक आजाराने पहिला बळी घेतल्याने प्रशासनासाठी आणि मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.