मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकाने 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोप या शिक्षकाने केला आहे.



मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं शिक्षकाने एका पत्रात लिहिलं होतं. त्यानुसार हा शिक्षक आज दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजबाहेर पोहोचला आणि काहीतरी पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.



यावेळी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोलिस तसंच त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी शिक्षकाला रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही कोणतातरी द्रव पदार्थ त्याने प्राशन केला, असं त्याच्या भावाने सांगितलं. यानंतर शिक्षकाला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.