मुंबई : मुंबईकरांनो जागते रहो...मुंबईसाठी हा नवा मंत्र 26 जानेवारी 2020 पासून लागू झाला आहे. कारण, आता मुंबईत येणारी प्रत्येक रात्र ही नाईट लाईफची असेल. मुंबईत, नाईट लाईफच्या पहिल्या रात्रीला व्यसायिकांनी दिलेला तसा थंडच म्हणावा लागेल. काही ठिकाणी नाईट लाईफ रात्री तीनपर्यंत सुरु राहिली तर काहींनी पुरेशी तयारी नसल्याने नंतर बघू असा पवित्रा घेतला. त्यामुळे, नाईट लाईफची पहिल्या रात्रीला अजून तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.


नाईट लाईफच्या पहिल्या रात्रीची सुरुवात तर झोकातच झाली, शेवट मात्र म्हणावा तसा झाला नाही. वरळी सी-फेसवर रात्री दहाच्या सुमारासही दिवसभर असते तेवढीच गर्दी होती. मुंबईची नाईट लाईफ अधिकृतरित्या आता सुरु होणार त्यामुळे ही गर्दी जरा जास्तच उत्साहात होती. मुंबई 24 तास जागती ठेवण्याची ही कल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्या आदित्य ठाकरेंनीही वरळी-सीफेसच्या वरळी फेस्टिवलला रात्री हजेरी लावली.


तशीही मुंबईला झोपण्याची सवय कमीच. ती कायम जागीच असते आणि या शहराला जागतं ठेवतो तो मुंबईकर. एकीकडे, मुंबईकर नाईट लाईफसाठी उत्सुक असले तरी मात्र, नाईटलाईफ सुरु करण्याची मुख्य ठिकाणं म्हणजे मॉल, रेस्टॉरंट आणि चौपाट्या इथे मात्र नाईट लाईफची तयारी थंडच होती.


Night Life | मुंबईत आज मध्यरात्रीपासून 'नाईट लाईफ'ला सुरुवात


मुंबईतील पहिल्याच नाईट लाईफचा अनुभव निराशाजनक होता. नाईट लाईफ सुरु होणार म्हणून उशिरा शॉपिंग करुन जेवायला गेलो, पण, सगळं बंद झालं होतं, अशी प्रतिक्रिया एका कुटुंबाने दिली. तसंच काही मॉल आणि चौपाटीवर नाईटलाईफ मात्र दिसली नाही. मॉल आणि रेस्टॉरंट्स तर खुले नाहीत. त्यामुळे जर कुठे नाईटलाईफ दिसलीच तर ती रात्री उशिरापर्यंत किटलीतून चहा विकणाऱ्या आणि तो घेणाऱ्यांमध्ये.


नाईटलाईफचे नियम काय?
पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांची काय काय जबाबदारी असणार याचे नियम आहेत. नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी कुठले नियम पाळणे गरजेचे आहे, याची विस्तृत नियमावली महापालिकेने बनवली आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु विकताना आढळल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. तसेच तेथील मॉल किंवा मिलला नाईटलाईफ सुरु ठेवण्यास परवानगी नाकारली जाईल. कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.


जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, बीकेसी, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉईंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक म्हणजे वाहनावरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल. परंतु एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील, जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील.