मुंबई: राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत दरेकरांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नयेत असे निर्देश कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. बुधवारी दरेकरांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात रितसर याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दरेकरांनी तातडीनं गुरूवारी सकाळीच ही याचिका दाखल केली. ज्यावर विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे दुपारच्या सत्रात सुनावणी पार पडली. 


दरेकरांची ही याचिका नुकतीच प्राप्त झाल्यानं त्यावर उत्तर देण्यासाठी सरकारी पक्षाकडून सोमवारपर्यंतचा वेळ मागून घेण्यात आला. मात्र सुनावणी होईपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात यावा अशी मागणी त्याचे वकील आभात पोंडा यांनी कोर्टाकडे केली. जी स्वीकारत कोर्टानं त्यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश देत यावर 21 मार्च रोजी दुपारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.


प्रवीण दरेकरांनी आपण मजूर असल्याबद्दल दिलेल्या चुकीच्या माहितीला अनुसरून हा गुन्हा मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चुकीची माहिती देत त्यांनी संस्थेची आणि लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप पोलीसांनी ठेवला आहे. सहकार विभागाच्या जॉईंट रजिस्ट्रारनं दरेकरांचं मजूरपद रद्द केलेलं आहे. मात्र याचा मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत असलेल्या मुंबई बँकेतील आर्थिक घोटाळ्यातील गुन्ह्याशी थेट संबंध नाही असं राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं होतं.


मजूर प्रकरणी मुंबई पोलिसांनी नव्यानं दाखल केलेल्या प्रकरणात अटकेपासून दिलासा मागत प्रवीण दरेकरांनी बुधवारी तातडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यात सुरूवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं की, 'आज दैवकृपेनं आणि जनतेच्या आशीर्वादानं पुढारी आहे, मात्र 'त्या' काळात सहकारी संस्थेत मी मजूरच होतो', प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल 1997 मध्ये होतो सभासद होतो, मात्र 25 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेली ही तिसरी एफआयआर आहे अशी माहितीही दरेकरांच्या वतीनं देण्यात आली. 


याशिवाय मुंबई बँकेतील अध्यक्षपदाचा गैरवापर करत आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा दरेकरांच्या वतीनं करण्यात आला होता. गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयानं अटकेपासून दिलासा देताच प्रवीण दरेकरांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत केवळ राजकीय सूडबुद्धीनं मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha