Mumbai News : मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड (Car Vandalized) करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी (Bhoiwada Police) ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे. यावेळी आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केल्याचीही माहिती मिळत आहे. 


सदावर्तेंच्या परळ (Parel) येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, मला वारंवार धमक्या येत आहेत, असा दावाही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान, गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड? 


वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. हे दोघेही मुख्य याचिकाकर्ते होते. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द झालं होतं. यामुळे तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, याचाच राग मनात ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 


दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तब्बल तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 


नेमकं काय घडलं? 


वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


पाहा व्हिडीओ : Gunratna Sadavarte Car Sabotage : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड, पोलिसांकडून तिघांना अटक