Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांना निरोप पाठवला आहे. 


पीयूष गोयल शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात पंतप्रधानांचा संदेश घेऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांचा संदेश दिला. पंतप्रधानांनी लता दीदींच्या कुटुंबीयांना संदेश दिला आहे की,"लता दीदींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत".


मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मधुर भांडारकर, आशा भोसले, आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे आणि श्रद्धा कपूरनेदेखील  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. 


कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती.


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता दीदींना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Critical : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंनी घेतली भेट


Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती


Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर कोरोनामुक्त; दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha