मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. आज शेवटच्या दिवशी हेल्मेट सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणुकही आज होणार आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे प्रकाश मेहतांच्या पत्रकारासोबतच्या उद्दामपणावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाबाबत सायंकाळी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील. तसंच विरोधकांच्या वतीनं देखील पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
वेगळा विदर्भ आणि गेले दोन दिवस महाड दुर्घटा यावरुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. किंबहुना, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुनच अर्ध्याहून अधिक अधिवेशन खर्च झालं. आज शेवटच्या दिवशीही सरकारला घेरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे.