मुंबई : गेल्या तीन दशकात मुंबईतील बांधकाम क्षेत्रात 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागील 3 दशकात जमीन वापराच्या पद्धतीत झालेले बदल आणि अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टमुळे मुंबईतील तापमानातसुद्धा मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमानात मागील 27 वर्षात सरासरी 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईतील 81 टक्के मोकळ्या जागा, 40 टक्के हिरवळ क्षेत्र आणि 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. तसेच मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मागील 5 वर्षात एकाच वेळी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि तीव्र दुष्काळाच्या नोंदी झाल्या आहेत. राज्यात मागच्या 5 वर्षात सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्रातील 50 टक्के जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 घटनांची नोंद झाली आहे. 31 जिल्ह्यांमध्ये एकूण 175 घटानांची अतिवृष्टीमध्ये नोंद झाली असून, 36 जिल्ह्यांमध्ये 189 घटनांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. मागील दशकभरात 79 तीव्र दुष्काळाच्या महाराष्ट्रात नोंदी झाल्या आहेत. 2000 ते 2009 या काळात 23 तीव्र दुष्काळाच्या घटना आहेत. तर 1990 ते1999 या काळात 17 घटनांची नोंद आहे.
मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका
किनारपट्टी भागातील शहरांबद्दल सुद्धा काही महत्त्वपूर्ण नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला 2050 पर्यंत महापुराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. 1991 ते 2018 सालामध्ये मुबईतील तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. कांक्रिटीकरण, पाणथळ जागा नष्ट होणे, खारफुटी क्षेत्राचा ऱ्हास होणे आणि मुंबईतले हिरवळ क्षेत्र कमी होत असल्याने तापमानात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून आयपीसीसी अहवाल आणि महाराष्ट्रातल्या नोंदींसंदर्भात महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात आले होते.
अर्बन हिट आयलॅण्ड म्हणजे?
‘हिट आयलॅण्ड’ म्हणजे शहरीकरण झालेला असा भाग, ज्यामध्ये त्यापासून अलग असलेल्या भागापेक्षा खूप अधिक तापमान अनुभवायला मिळते. इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अशा रचनांमध्ये जंगल आणि जलक्षेत्रे यासारख्या नैसर्गिक ठिकाणांपेक्षा अधिक प्रमाणात सूर्याची उष्णता शोषली आणि पुन्हा उत्सर्जित केली जाते. शहरी भागातील संरचना ही खूप अधिक प्रमाणात केंद्रीकृत झालेली असते आणि हरितकरणाचे प्रमाण मर्यादित असते, अशावेळी या केंद्रापासून अलग असलेल्या भागाच्या तुलनेत शहरात उच्च तापमानाचे ‘बेट’ तयार होते. शहरी भागातील तापमान हे अलग असलेल्या भागापेक्षा दिवसा 1 ते 7 अंश सेल्सिअसने आणि रात्री २ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक असते.
महत्त्वाच्या बातम्या: