Lalit Patil CP Press Live : ड्रगमाफिया (Drug Case) ललित पाटीलच्या (Lalit Patil) बंगळुरूत मुसक्या आवळल्यावर त्याला मुंबईतील अंधेरी कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात 14 आरोपी अटकेत होते. काल 15 वा आरोपी ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस काय म्हणाले?
मुंबई पोलिसांतील कायदा सुव्यवस्था सहआयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग परमजीतसिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. "मुंबई पोलिसांना 10 ग्रॅम ड्रग्ज सापडलं होतं. त्याच्या तपास करता करता नाशिक, पुणे येथे धाडी टाकल्या. या सर्व धाडींमध्ये 150 किलो MD ड्रग सापडलं, ज्याची किंमत 300 कोटी आहे. त्या सर्व प्रकरणामध्ये हे 15 आरोपी आहेत. हे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत", असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
ड्रग्जप्रकरणात पोलिसांनी 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल ललित पाटीलला अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या 15 वर पोहोचली. साकीनाका पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. कोर्टाने ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
साकिनाका पोलीस ठाण्यात एनपीएसचा गुन्हा दाखल होता. ऑगस्टमध्ये 10 ग्राम एमडी सापडलं होतं. यात पुढील तपासांत 150 किलो एमडी जप्त केलंय. ज्याची किंमत अंदाजे 300 कोटी आहे. सापळा रचून ललित पाटीलला कर्नाटकातून अटक केलीय. तो आज जे काही बोललाय त्याबाबत पुणे पोलीस अधित तपास करतील. आमची केस ड्रग्जशी संबंधित आहे, असं पोलीस म्हणाले.
ललित पाटीलच्या गौप्यस्फोटाचा तपास पुणे पोलीस करणार
मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, मला पळवलं गेलं, यामध्ये कोणाकोणाचा हात आहे मी सगळं सांगणार, यासंदर्भात मुंबई पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, ललित पाटील आज जे काही बोललाय त्याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करतील. आम्ही तपास ड्रग्जच्या दिशेने करणार आहे.
कशी केली अटक?
साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे.त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती. पुणे,नाशिक, इंदोरवरून तो गेला सुरतमध्ये गेला. त्यानंतर पुन्हा नाशिक धुळे, औरंगाबाद करत कर्नाटकात त्याने प्रवेश केला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.