मुंबई: नवसाला पावणारा बाप्पा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मुंबईतील लालबागच्या राजाची पूजा करतात. बाप्पाच्या दर्शनासाठी कित्येक तास रांगेत उभा राहतात. मात्र, लालबागच्या राजाच्या दरबारात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यंदा लालबागचा राजा घुबडावर विराजमान होऊन आले आणि यामुळेच चर्चेला सुरुवात झाली.


 

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन झालं आणि अवघ्या गणेशभक्तांनी मनोभावे हात जोडले. पण बाप्पाच्या वाहनावर नजर गेली आणि कुजबुज सुरु झाली.

 

ज्याचं नाव उच्चारणं अशुभ मानलं जातं. ज्याला पाहिलं की संकट येतं, असा खुळचट समज आहे. त्याच घुबडाला बाप्पाच्या मागे प्रभावळीत स्थान दिल्यानं भक्त चक्रावले. पण भक्तांची ही शंका मंडळानं दूर केली आहे.

 

गणपती ही विद्येची देवता आहे तर घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. त्यामुळेच यंदा लालबागचा राज घुबडावर विराजमान झाला आहे. असं माहिती मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे.

 

खरं तर घुबड माणसाच्या दैनंदिन आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. डोंगर कपारीत, वृक्षांच्या ढोलीमध्ये दृष्टीआडच्या सृष्टीत त्याचे वास्तव्य असतं. पिकांवरचे कीटक आणि उंदीर हे घुबडाचे मुख्य खाद्य आहे. हा पक्षी निशाचर असल्याने त्याचे दर्शन रात्रीच होते. पण बटबटीत डोळ्यांमुळे पक्षीजमातीत भीतीदायक म्हणून बदनाम आहे.

 

जे लोक घुबडांना अपशकुनी मानतात... त्यांच्यासाठी गणपती हे वाईट प्रवृत्तीवर आरुढ झाले आहेत असं मानावं. असं प्रतिक्रिया पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

 

खरं तर घुबडं नाही, तर माणसंच घुबडांसाठी अपशकुनी असतात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

 

भारतात घुबडाच्या जवळपास 26 प्रजाती नोंद आहेत. त्यातल्या 6 प्रजाती एकट्या अंदमानमध्ये आहेत. रानपिंगळा या जमातीचे फक्त 260 घुबडं शिल्लक आहेत.

 

ज्या देवानेच ही सृष्टी तयार केली. त्यातली कोणतीही गोष्ट अपशकुनी कशी असेल? त्यामुळे या सृष्टीच्या निर्मात्याच्या मागे मोर असो, सिंह असो किंवा घुबड. त्याकडे शकून-अपशकुनापेक्षा भक्तीभावाने पाहिलं, तरच बाप्पा प्रसन्न होतील.