मुंबई : सेन्सॉर बोर्डाचं कायमच दुटप्पी धोरण राहिलं आहे. सेन्सॉर बोर्ड म्हणजे थट्टा झाली, अशी घणाघाती टीका हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केली. 'आणि मग एक दिवस..' हे नसिरुद्दीन यांचं आत्मचरित्र मराठीत प्रकाशित झालं आहे. त्यानिमित्ताने एबीपी माझावरील 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
FTII वरुन गजेंद्र चौहांनांना टोला
"गजेंद्र चौहान यांनी तब्बल 600 मालिका केल्या आहेत. एवढ्या मालिका तर भारतातही अजून बनल्या नसतील. शिवाय, गजेंद्र चौहान यांनी अनेक 'लोकप्रिय' सिनेमेही केले आहेत", असा उपरोधिक टोला नसिरुद्दीन शाह यांनी लगावला.
प्रत्येक अभिनेता शम्मी कपूरसारखाच दिसायला हवा, असं नाही. दिसणं महत्त्वाचं नसतं, असेही नसिरुद्दीन शाह म्हणाले.
"गावस्कर, संदीप पाटलांसोबत क्रिकेट खेळलो"
"जर मला योग्य प्रशिक्षण मिळालं असतं, तर मी चांगला क्रिकेटर बनलो असतो. सुनील गावस्करांसोबत क्रिकेट खेळलोय. संदीप पटलांसाठी गोलंदाजी केलीय आणि विशेष म्हणजे संदीप पाटलांनी माझ्या गोलंदाजीवर फार चांगली फलंदाजी केली नाही.", हा किस्साही नसिरुद्दीन यांनी यावेळी सांगितला.
"शेवटचा पाहिलेला मराठी सिनेमा सैराट"
"गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमे अधिक आशयघन होताना दिसतायेत. मधल्या काळात दादा कोंडकेंनी विनोदी काळ आणला आणि त्यानंतर काही वर्षे तसंच सुरु राहिलं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा अधिक चांगला होताना दिसतो आहे. शेवटचा पाहिलेला मराठी सिनेमा म्हणजे सैराट.", असेही नसिरुद्दीन शाह यांनी सांगितले.
"डॉ. लागू यांच्याएवढा परिपूर्ण अभिनेता पाहिला नाही"
'माझा कट्टा'वर नसिरुद्दीन शाह यांनी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख केला. डॉ. लागू यांच्याबाबत बोलताना नसिरुद्दीन म्हणाले, "डॉ. लागू यांच्याएवढा सच्चा आणि परिपूर्ण अभिनेता मी आजतागायत पाहिला नाही."