मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप वानखेडे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. ही सत्याची लढाई आहे आणि विजय आपलाच होणार असल्याची प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली आहे.


क्रांती रेडकर यांच्यासोबत समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहिण यास्मिन वानखेडेही उपस्थित होते. आपल्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे. 


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं सांगत त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ड्रग्ज केसमध्ये 18 कोटींची डील झाली असून त्यामधील आठ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचं प्रभाकर साईल याने सांगितलं होतं. 


समीर वानखेडे यांचे संबंध हे ड्रग्ज पेडलरशी असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. तसेच समीर वानखेडे यांची बहिण आणि त्यांची मेहूणी यांच्यावरही नवाब मलिकांनी काही आरोप केले होते. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद वानखेडे असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 


या प्रकरणावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं असून रोज नवनवे खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये आता आरोपांची पातळी अगदी वैयक्तीक स्तरावर आली असल्याचं दिसत आहे. 



महत्वाच्या बातम्या :