पुणे : या महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठी लोक आहेत. मात्र आता जे चित्र दिसतं आहे त्यावरुन ही लढाई एनसीबी विरुद्ध सुरु आहे, क्रांती रेडकर यांच्या विरुद्ध नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते पुण्यातील पत्रकार संघाच्या व्याख्यानमालेत बोलत होते. आमच्या मराठी लोकांविरुद्ध कारवाई होते, अजित पवार, भावना गवळी, अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जाते, मग हे मराठी नाहीत का असा सवालही त्यांनी विचारला. क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून एनसीबी विरुद्ध राज्य असा सामना बघायला मिळत आहे. त्यातून गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या संबंधी अनेक खुलासे केल्याचा दावा केला आहे. त्यावरून समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली होती. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांती रेडेकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
राज्यातील एसटी कर्मचारी मृत्यू हा महत्वाचा विषय आहे, एसटी कर्मचाऱ्यांचीही वकिली करायला हवी. मुख्यमंत्री एसटी कर्मचारी प्रश्नावर गंभीर आहेत असं संजय राऊत म्हणाले. 2024 सालचं दिल्लीतील चित्र आतापेक्षा पूर्णतः वेगळं असेल. कॉग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊ शकत नाही, कॉग्रेस राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल असंही संजय राऊत म्हणाले.
देशातील माध्यमांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कुठल्याही सरकाराला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते वृत्तपत्र नको असतं. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात मृतदेहांचा फोटो एका वृत्तपत्राने दाखवला, तेव्हा आठ दिवसांत त्या वृत्तपत्रावर धाडी टाकण्यात आल्या. मग त्यावेळी त्याच्या पाठीशी कोणं उभारलं? देशाची मीडिया उद्योजकाच्या हाती जातेय. वृत्तपत्राशिवाय सरकार अन सरकार शिवाय वृत्तपत्र शक्य नाही."
महत्वाच्या बातम्या :