suspension of st workers मुंबई: मागील काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने विविध कारणांखाली राज्यातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यातील 16 विभागातील 45 आगरांमधील 376 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. 


'जिथे रस्ता, तिथे एसटी' अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज दुसऱ्या दिवशीही एसटी रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. काल 90 टक्के कामगार हजर नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे. न्यायालयात याबाबत सरकारनं माहिती दिल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे आजही राज्यभरात एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.


राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. 


नांदेडमधील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर या आगारातील 58 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट आगारातील 40, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील 57, सांगली जिल्ह्यातील जत, पलुस, इस्लामपूर, आटपाडी आगारातील 58 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


एसटी महामंडळाने संपकरी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी एसटीतील कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एसटी महामंडळाने कारवाई केली तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले.