Koregaon Bhima Case : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil), सुवेझ हक (Suvez Haque) आणि डॉ.शिवाजी पवार (Dr. Shivaji Pawar) यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे जाणून घेतलं जाणार आहे.


सह्याद्री अतिथीगृहावर चौकशी


कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसंच या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची 21 ते 22 जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवारी, विश्वास नांगरे पाटील 24 ते 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 ते 25 जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.




याआधी शरद पवार यांनाही समन्स


कोरेगाव भीमामध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. याआधी अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तसंच या प्रकरणी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही समन्स बजावलं होतं. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे.  


काय आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण?


1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारा एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अनेक वाहनांची जाळपोळ झाली, मालमत्तेचं नुकसान झालं. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. अफवांमुळे औरंगाबाद, माजलगाव, परभणी, सोलापूर शहरांमध्येही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. औरंगाबादेतील उस्मानपुरा, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, टाऊन हॉलसह अनेक भागात जमावानं दुकानं बंद केली होती. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता. 


VIDEO : Vishwas Nangare Patil : कोरेगाव भिमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची होणार चौकशी