Sindhudirg Submarine Project : महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिलं पाणबुडी पर्यटन (Submarine Tourism Project) सिंधुदुर्गातून (Sindhudirg News) हलणार असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आधीच महाराष्ट्रातून काही मोठे प्रकल्प गुजरातला गेले. आता महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सोबतच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत नागरिकांना आश्वासनही दिलं आहे.


महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला?


सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गटाने) महाराष्ट्रातील पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून गुजरातला हलणार असल्याचा आरोप केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, ''खोट्या बातमीकांवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही.'' असं स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.


गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा : राऊत


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या चर्चांवरून सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी म्हटलं आहे की, ''आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्वाचे प्रोजेक्ट्स गुजरातमधे गेले. गेल्या दीड वर्षात गुजरातमधे वेगवेगळे महत्वाचे खेचून नेले गेले. मुंबईतील उद्योजकांमधे दहशत पसरवून त्यांना घेऊन जातायत. मी म्हणतो त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात, असं कुणीच कधी बोललं नाही.'' नारायण राणेंची तेवढी ताकद नाही, त्यांनी एवढी हिम्मत दाखवावी महाराष्ट्रातील एकही उद्योग राज्याच्या बाहेर जाऊ देणार नाही, असं म्हणत राऊतांनी राणेंवरही टिकास्त्र डागलं आहे.


प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही : संजय शिरसाट


शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ही प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ''पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी आली, कन्फर्मेशन झालेलं नाही, पण एक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. त्याची चर्चा होताना दिसत नाही. मागे हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेला असल्याचं सांगितलं गेलं. पाणबुडीचा प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही. प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रात अनेक उद्योजक इकडे येण्यासाठी इच्छुक असतात, त्यासाठी या सरकारने प्रयत्न केले आहेत.''


तयारी राज्याने करायची आणि प्रकल्प गुजरातने न्यायचं : दानवे


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्पाबाबत सरकारला धारेवर धरत म्हटलं आहे की, ''तयारी राज्याने करायची आणि प्रकल्प गुजरातने न्यायचं आणि जे लोक आहेत, राणे, सामंत केसरकर यांना फक्त आमच्यावर टीका करायची काम आहे, यांचा बुडाखालचा पाणबुडी प्रकल्प गेला, हे आपल्या दृष्टीने हीतवाह नाही. रिफायनरी नाही न्यायची, फक्त ज्यातून फायदा ते नेतात, हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहील. कारण, गुजरातच्या लोकांसमोर आपल्या नेत्यांची तोंड उघडत नाही. तिथं केंद्रातील सूक्ष्म मंत्री आहेत, राज्याचे उदयोग मंत्री आहेत तरी इतका चांगला प्रकल्प गेलाय.''


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Submarine Project : मोठी बातमी! महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार? आमदार वैभव नाईक यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांचं उत्तर काय?