'नर्स'च्या हाती BMC ची कमान, मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती निश्चित
एबीपी माझा वेब टीम | 18 Nov 2019 10:48 PM (IST)
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेत आलेल्या दुराव्यामुळे भाजप शिवसेनेच्या विरोधात महापौरपदाचा उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता होती. मात्र, अखेरीस महापौरपदाची माळ शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकरांच्या गळ्यात पडली आहे.
मुंबई : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. पेडणेकर वगळता इतर कोणत्याही पक्षानं उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका महापौरपदावर किशोरी पेडणेकरांची नियुक्ती निश्चित झाली आहे. 22 नोव्हेंबरला होणारी महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होत असली तरी शिवसेनेसाठी ती धाकधुक वाढवणारी होती. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेत आलेल्या दुराव्यामुळे भाजप शिवसेनेच्या विरोधात महापौरपदाचा उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता होती. मात्र, अखेरीस महापौरपदाची माळ शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकरांच्या गळ्यात पडली आहे. तर उपमहापौरपदासाठी अॅड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही नियुक्ती झाल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.