मुंबई : राष्ट्रपती राजवटीमुळे बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष  त्वरित सुरू करावा, अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. कक्ष बंद असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. मुख्य सचिवांच्या कार्यालयाबाहेर रूग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केली. शुक्रवारपर्यंत कक्ष सुरू होईल, असं आश्वासन मुख्य सचिव कार्यालयाच्या वतीने देण्यात आलं आहे.

राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आल्याने 5 हजार 657 रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अद्याप सहाय्यता निधी कार्यरत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा उद्रेक झाला असून मुख्य सचिवांच्या कार्यालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी केली आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं कार्यालय आहे.

CMRF | मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अद्यापही बंद, नागरिकांचा उद्रेक | ABP Majha



राज्यात सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे रुग्णांच्या मदतीसाठीचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आला होता. त्यामुळं राज्यातील 5 हजार 657 रुग्ण मृत्यूच्या छायेत असल्याची बातमी 'एबीपी माझा'ने प्रसारीत केली होती. या बातमीनंतर राजकीय नेत्यांना जाग आली.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आतपर्यंत सुमारे 21 लाख रुग्णांना गेल्या 5 वर्षात 1600 कोटींची मदत करण्यात आली आहे. सध्या कक्ष बंद असल्याचा फलक काढला आहे.