नवी दिल्ली : शरद पवारांच्या गुगलीमुळं महाशिवआघाडी सरकारची शक्यता धूसर होत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र भाजप-शिवसेनेला एकत्र आणण्यासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. भाजपला तीन वर्षे तर शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी संजय राऊत तयार असल्याचा दावा रामदास आठवलेंनी केला आहे. एवढंच नव्हे तर लवकरच भाजपशी चर्चा करुन पुन्हा शिवसेना नेत्यांशी संपर्क करणार असल्याचं आठवले म्हणाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्रिपदासाठी तीन आणि दोन वर्षांचा फॉर्म्युला सांगितला असून तो त्यांना मान्य असल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे.

भाजपासोबत तडजोड करावी यासाठी आपण संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं रामदास आठवले म्हणाले. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आणि सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. याच मुद्द्यावरुन रामदास आठवले यांनी आपण संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं. तडजोड करण्यासंबंधी मी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना तीन वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला सांगितला. यावरुन त्यांनी भाजप हा फॉर्म्युला मान्य करण्यास तयार असेल तर आपण विचार करु शकतो असं सांगितलं. मी भाजपाशी यासंबंधी चर्चा करणार आहे, असे आठवले म्हणाले.


आठवले यांनी याआधी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते की, एनडीएमध्ये जी फुट पडली आहे ती बरोबर नाही. शिवसेना ही एनडीएमध्ये असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 225 जागा मिळायला पाहिजे होत्या. पण आपापसात दोन्ही पक्षांच्या बंडखोरीमुळे चाळीस-पन्नास जागांचा फटका बसला हे मी बैठकीत सांगितलं, असेही आठवले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले होते. बाळासाहेबांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला साथ सोडावी, असेही आठवले म्हणाले होते. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढच्या वेळी होऊ शकेल. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद आणि चांगली खाती घेऊन सरकार बनवावे, असेही आठवले म्हणाले होते. मात्र आज त्यांनी पुन्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाष्य केलं आहे.


एनडीएच्या बैठकीत शिवसेनेविषयी चर्चा झाली नाही. मी बैठकीत शिवसेनेला सोबत घेण्याविषयी चर्चा केली, असे देखील आठवले म्हणाले होते . भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार आजिबात टिकणार नाही, असेही ते म्हणाले होते.