मुंबई : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर उपमहापौरपदासाठी अॅड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही नियुक्ती झाल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं. शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धा सोडवण्यासाठी आणि नाराज इच्छुकांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब मुंबई महापालिकेत दाखल झाले. अनिल परब यांच्या उपस्थितीतच किशोरी पेडणेकर यांचा महापौरपदाचा अर्ज दाखल करण्यात आला.

मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक नगरसेवकांनी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, शेखर वायंगणकर यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांची नावं आघाडीवर होती. अखेरच्या क्षणी यशवंत जाधव यांचं नाव पिछाडीवर पडलं आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

भाजपचा उमेदवार न देण्याचा निर्णय
मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजप उमेदवार देणार नाही. मुंबई महापालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार असल्याचं समोर येत आहे.
आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 2022 ला मुंबईत भाजपचा महापौर असेल, असं भाजपचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक मनोज कोटक यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप महापौर निवडणुकीत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाहीत.

संबंधित बातमी

Mumbai Mayor | मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, सूत्रांची माहिती