कल्याण : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. टिटवाळा गुरुवली येथील जमिनीच्या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.


यावेळी सोमय्या यांनी सांगितलं की, एनईसीएलच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या रकमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे 78 एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईडीने जप्त करण्याची नोटीस 2014 सालीच काढली होती. आता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेल्या घोटाळेबाज सरनाईकांच्या विरोधात ठाकरे सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. 13 हजार गुतंवणूकदारांचे 560 कोटी रुपये सरनाईक यांनी गायब केले आहेत. घोटाळ्याषी सरनाईक यांचा थेट संबंध आहे. 100 कोटी रुपये सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी सरनाईकांच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.


ठाकरे सरकारच्या दबावाला भीक घालत नाही
यावेळी सोमय्या म्हणाले की, सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एका मागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे असे सोमय्या यांनी सांगितले.


किरीट सोमय्या यांना वाहतूक कोंडीचा फटका
कल्याण-टिटवाळा येथील गुरवली येथे येण्यासाठी मुंबईहून निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना टिटवाळा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यांची गाडी वाहतूक कोंडीत फसली. अखेर स्वत: सोमय्या गाडीतून उतरले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करत आहे. ठाकरे सरकारच्या काळात प्रगतीची गती ही थांबली आहे. महापालिका निवडणूका जवळ आलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत जनता ठाकरे सरकारला धडा शिकवणार आहे अशी टीका सोमय्या यांनी केली.