मुंबई : राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. यावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सुरक्षा कमी केल्याने भाजप नेते राज्य सरकारवर टीका करत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करा असं म्हंटल आहे. याबाबत शरद पवार अनिल देशमुखांना पत्र लिहून मागणी करणार आहेत.
गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे? यावर सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवाला नुसार अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणीही विरोधी पक्षाचा आहे, म्हणून सुरक्षा कमी करण्यात आली नाही. समितीच्या अहवालनुसार थ्रेट परसेप्शन किती यावर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
या नेत्यांची सुरक्षा कमी
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाकरे सरकारचा दणका; फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी रिव्ह्यू मिटींग झाली. ही मिटींग दर एक ते दोन महिन्यांमध्ये होते. कोविड काळात पोलिसांवर खूप ताण आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.