या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आपल्या सरकारला6 महिने पूर्ण होत आहेत. एक चांगला अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा आपल्याला पडला. आज देशाचीच अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन महाराष्ट्र पुढील काळात काय करू शकतो ते पाहण्याची गरज आहे.
कोरोना नंतर जग बदलणार आहे, अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. दर्जेदार पिक घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही आपण पहिले पाहिजे. पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कापूस, ज्वारी, मका खरेदी सुरू
राज्यात 410 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. आतापर्यंत 344 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस 15 ते 20 जून पर्यंतखरेदी केला जाईल. 163 कापूस खरेदी केंद्र कार्यरत. दररोज 2 लाख क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात 98 हजार 933 शेतकऱ्यांकडून 9 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे.
राज्यात ज्वारी, मका, खरेदीसाठी 75 केंद्र सुरू आहेत. त्यात 29 जिल्ह्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीसाठी 293 खरेदी केंद्र असून आतापर्यंत 1 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
राज्यात विविध पिकांखाली एकूण खरीप क्षेत्र 140.11 लाख हेक्टर आहे. यात सोयाबीन व कापूस 82 लाख हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांना बियाणांची गरज 16.15 लाख क्विंटल आहे. तर बियाणांची उपलब्धता 17.01 लाख क्विंटल इतकी आहे. सोयाबीन व कापूस या पिकांखाली खरीपाचे 60 टक्के क्षेत्र आहे, अशी माहिती आहे.
मागच्या वर्षी तुरीत चांगली वाढ झाली. सोयाबीन आणि कापसातही मागच्या वर्षी चांगली वाढ असल्याची माहिती या बैठकीतून मिळाली आहे.
2020 चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी 96 % ते 104 % टक्के राहील असा अंदाज आहे. तर अल-निनो सामान्य राहणार. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात अल निनोची स्थिती असेल. मान्सूनचे केरळला आगमन 5 जूनला होईल असा अंदाज आहे. मौसमी पाउस राज्यात काहीसा उशिरा येईल. मुंबईत ११ जूनपासून पाऊस सुरु होईल पण 18 जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल.
लॉकडाऊननंतर काय?
- लॉकडाऊन नंतर दररोज 2 हजार टन भाजीपाला आणि फळे यांची 3200 पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री.
- 3790 गटांमार्फत 9 लाख 68 हजार 550 क्विंटल फळे व भाजीपाला ऑनलाईन व थेट विक्री. यासाठी राज्यात 3212 थेट विक्री केंद्रे स्थापन.
- हापूस आंब्याच्या विक्रीसाठी कृषी व पणन विभागामार्फत प्रयत्न
- कृषी माल निर्यातीसाठी आवश्यक फायटोसेनिटरी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.
- शेतमाल आणि कृषी निविष्ठा विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी परिवहन आणि गृह विभागाचे परवाने
- बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतमालाची विक्री
- शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण
- जिल्ह्यातील सर्व बियाणे प्रक्रिया केंद्रे सुरु
- बियाणे उत्पादक कंपन्यांशी सातत्याने व्हिसीद्वारे संपर्क
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे जिल्हा आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष
- शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणे मिळावेत म्हणून 3 हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन.
- 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु. गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न.