मुंबई : एका कंपनीच्या शेअर्स विक्री व्यवहाराप्रकरणी व्यवसायातील भागिदाराची मानहानी झाल्याने 35 लाख डॉलर्स घेण्यासाठी पात्र नाही असा आदेश देणाऱ्या आर्बिट्रेशन विरोधात हायकोर्टात धाव घेणाऱ्या बॉलिवूडचा स्टार जॅकी श्रॉफला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती शरिष गुप्ते यांनी आर्बिट्रेशनचा निकाल फेटाळून लावत भागिदारानं जॅकीला 35 लाख डॉलर देण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 10 वर्षानंतर हे प्रकरण निकाली निघालं आहे.
काय आहे प्रकरण?-
साल 2010 मध्ये जॅकी श्रॉफ व रतनाम अय्यर हे बिझनेस पार्टनर होते या दोघांकडे मल्टी स्क्रीन मीडिया या कंपनीच्या शेअर्सची मालकी होती. शेअर विकण्यासाठी बँकेनं कागदपत्रांवर जॅकीची सही मागितल्यामुळे जॅकीने पोलिसांकडे धाव घेत बिझनेस पार्टनर अय्यर व इतर काही जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार मागे घेतल्यानंतर जॅकी श्रॉफला एकूण 35 लाख डॉलर्स देण्याचे सर्वांनी मान्य केले. सुरुवातीला 15 लाख डॉलर्स व उर्वरित 20 लाख डॉलर्स शेअर विकल्यानंतर देण्याचे अय्यर यानं लेखी कबूल केलं. दोघांमध्ये तसा करारही करण्यात आला हा करार करताना दोघांना काही अटी घालण्यात आल्या. शेअर्स विकल्याची माहिती अय्यर याने जॅकीला देणे बंधनकारक असून जॅकीनंही व्यवहार पूर्ण होईपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करू नये, असं ठरलं. मात्र कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा करत अय्यर याने आर्बिट्रेशनकडे धाव घेतली त्यानंतर आर्बिट्रेटरने याची दखल घेत जॅकी श्रॉफ भरपाईसाठी पात्र नाही असा निकाल दिला होता.
का झाला वाद?-
जून 2011 मध्ये हे शेअर्स विकल्याची माहिती मिळाली असून त्याबाबत आपल्याला माहिती न दिल्याचा ई-मेल जॅकीची पत्नी आएशानं अय्यरला धाडला होता. त्या ईमेलला उत्तर देताना अय्यरनं म्हटलं की व्यवहार अद्याप पूर्ण झालेला नाही. तुम्हाला तुमचे दिले जातील त्यानंतर तुम्ही या व्यवहारातून बाहेर पडू शकता. या ईमेलला पुन्हा जॅकीची पत्नी आएशानं रिप्लाय दिला व त्यात असे म्हटले की लबाड आणि फसवणूक व्यक्ती बरोबर सौहार्दाचे व्यवहार करावेसे कोणालाच वाटणार नाही. या पत्रामुळे आपली बेअब्रू झाली असून कराराचंही उल्लंघन झाले आहे, असा दावा करत अय्यरनं आर्बिट्रेटरकडे धाव घेतली. निकाला याचिकाकर्त्याच्या बाजूनं गेल्यानं जॅकीनं अॅड. श्याम देवानी यांच्यामार्फत या निकालाविरोधात हायकोर्टात अपील केलं होतं. या अपीलाची दखल घेत न्यायालयाने आर्बिट्रेटरचा निर्णय अखेर रद्द करत जॅकी श्रॉफला 35 लाख डॉलर्स देण्याचे आदेश रतनाम अय्यरला दिले आहेत.