Sujat Ambedkar on Ketaki Chitale : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिनं केलेलं ट्वीट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. तर माध्यमांनी सध्या प्रश्न आणि उत्तर सभा सोडून महाराष्ट्रात टँकर विक्री किती वाढली आहे? यावर रिपोर्ट करावा, असा सल्ला देत त्यांनी टोला लगावला आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी काल (रविवारी) सुजात आंबेडकर आले होते.


कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांच्या मेंटल हेल्थलाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले. शरद पवार यांना महाराष्ट्रभर आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शोभनीय नव्हतं. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणा आहेत, कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले.


दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी यावेळी राजकारण्यांच्या भांडणात समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं. मीडियाचा नॅरेटिव्ह योग्य हवा. दोन पक्षांच्या भांडणात समाजाकडे दुर्लक्ष होत असून समाजाचे प्रश्न मांडणं महत्त्वाचं आहे. सुशांत सिंह, कंगना रनौत प्रकरणात कोरोना, रेमडेसिविर या प्रश्नांकडे मीडियाचं दुर्लक्ष झाल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले. आपल्याकडे अंबानी, अदानी इतका पैसा नसून त्यासाठीच प्रबुद्ध भारतसारखं माध्यम आपल्या हातात हवं. हीच गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षांपूर्वी देखील सांगितली होती. त्यामुळं समाजासाठी मीडियाचा नॅरेटिव्ह तितकाच महत्त्वाचा असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले. ए आणि बी म्हणजेच काँग्रेस आणि भाजप थोडक्यात यांच्या नॅरेटिव्हमध्ये अडकून वंचितांचे राजकारण बाजूला ठेवल जातं, हे आम्ही जे अनुभवलं त्यामुळे प्रबुद्ध भारत पाक्षिक स्वरूपात प्रबुद्ध भारत वेबसाईट, मग प्रबुद्ध भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि मग प्रबुद्ध भारतचे पुस्तक प्रकाशन हे मोठ्या प्रमाणात करत आहोत. हे आम्हाला अनुभवातून शिकायला मिळाला आणि या अनुभवानंतर जाणवलं की, हे करणं किती महत्त्वाचं होतं, असं आंबेडकर यांनी सांगितलं. 


भाषणाच्या सुरुवातीला भोंगा वादावर टोला


आपल्या भाषणाची सुरुवात करताना सुजात आंबेडकर यांनी भोंगा वादावर टोला लगावला. सुजात यांनी उपस्थितांना थोडीशी माफी मागतो आपल्याला वेळेचे पालन करायला लागणार आहे. लाऊडस्पीकर भोंगे वाजवायची वेळ असते आणि माझ्याच भाषणात आपल्या लोकांवरच केसेस झाल्या तर मला पटणार नाही, असं सांगितलं.