कल्याण : कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल आज अखेर इतिहासजमा झाला आहे. रेल्वे प्रशासनानं तब्बल सहा तासांचा महामेगाब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर उचलला. आता या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचं आव्हान एमएसआरडीसी समोर असणार आहे.


ब्रिटीशांनी 1914 साली उभारलेला हा पूल संपूर्णपणे लोखंडाचा असल्यानं त्याला पत्री पूल असं नाव पडलं. कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव दुवा होता. यावर्षी जुलै महिन्यात अंधेरीच्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पत्री पुलाचं आयआयटी मुंबईकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं, ज्यात पत्री पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली होती.


त्यानंतर 22 ऑगस्टपासून पत्री पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करत 25 सप्टेंबर रोजी पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. तर आज पुलाचा गर्डर उचलण्यात आला. तब्बल 60 टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी 600 आणि 400 टन क्षमतेच्या दोन अजस्त्र क्रेन मागवण्यात आल्या होत्या.


पुलाच्या गर्डरचे मधून दोन तुकडे करून ते क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात आले. या कामासाठी रेल्वेनं कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेतला होता. यादरम्यान डोंबिवली ते सीएसएमटी आणि कल्याण ते कर्जत, कसारा यादरम्यान रेल्वेनं तब्बल 178 लोकल फेऱ्या चालवल्या. तर कल्याण डोंबिवलीदरम्यानच्या प्रवासासाठी केडीएमटी आणि एमएसआरटीसी यांनी तब्बल 327 बस फेऱ्या चालवल्या.


दरम्यान, पत्री पुलाच्या जागी नवीन पूल उभारणीसाठी एमएसआरडीसी विभागाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढच्या आठ ते दहा महिन्यात इथे नवीन पूल उभारण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.


दुसरीकडे पत्री पुलाप्रमाणेच मुंबईतले आणखी काही पूल धोकादायक असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील एकूण 299 पुलांपैकी 198 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालं असून त्यात भायखळा आणि घाटकोपरचे पूल हे जीर्ण झाल्याचा गौप्यस्फोट रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे लवकरच हे दोन पूलसुद्धा पाडण्यात येणार आहेत. तर आणखी काही पूल सुद्धा धोकादायक म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे.


पत्री पुलाच्या पाडकामामुळे कल्याण शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून याजागी आता लवकरात लवकर नवीन पूल उभारण्याची गरज आहे.