मुंबई : हिवाळी अधिवेधशनाच्या पूर्वसंध्येला ठगबाजीचं चार वर्षे अशा बॅनरखाली विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना ठग संबोधलं होतं. विरोधकांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देतांना हा पोरकटपणा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गंभीर होण्याची गरज असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
विरोधकांनी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'चं पोस्टर तयार करत सरकारवर टीका केली. त्यामुळे मग मी काय 'गँग्ज ऑफ वासेपूर'ची पत्रकार परिषद झाली असं म्हणायचं का? अशी कोपरखळी विरोधकांना लगावली. विरोधकांकडे मुद्दे उरले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारे फिल्मी डायलॉग मारले जात असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेले प्रश्न आमच्या कार्यकाळात निर्माण झाले नाहीत. विरोधक सत्तेत असताना त्यांच्या कार्यकाळात हे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यांनी उत्तरे आम्ही आज देत आहोत. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही प्रभावीपणे उत्तरे दिलं असून पुढेही देत राहू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
'ठगबाजीची चार वर्षे', विरोधकांची टीका
आमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत विरोधकांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'चे पोस्टर तयार केलं होतं. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ठगांच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.
बॅनरवर आमिर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला होता. शिवाय 'ठगबाजीची चार वर्षे' असे शीर्षक या पोस्टरला दिलं होतं. उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात तयारी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली.
भाजप आणि शिवसेनेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी अशी विविध शीर्षकं देत सरकारवर बोचरी टीका केली आहे.