उल्हासनगर : एकीकडे सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलाची प्रतिमा मलीन झालेली असताना उल्हासनगरमध्ये खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडले. कारच्या धडकेत जखमी झाल्याने विव्हळत असलेल्या महिलेच्या मदतीला तातडीनं धावून जात एका वाहतूक पोलिसाने माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. 


कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस जितेंद्र चव्हाण यांनी स्वत: तत्काळ धाव घेत त्या महिलेला उचलून वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेलं. तिच्यावर प्रथमोपचार केले, यानंतर या महिलेला खाजगी टॅक्सीतून रुग्णालयात उपचारासाठी धाडले. हा प्रकार उपस्थित नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर खाकीतल्या माणुसकीला नागरिकांनी सलाम केला आहे.


उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मध्ये वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी जितेंद्र चव्हाण वाहतूक नियोजनाचे काम करत होते. याचवेळी रस्त्यातून चालणाऱ्या एका महिलेला एका कारने धडक दिली. या अपघातात सदर महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ती रस्त्यात विव्हळत पडली. तिला उठता येत नसल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी रस्त्यातील वाहने थांबवून या महिलेच्या दिशेने धाव घेतली. या महिलेला आधार देत त्यांनी उठवले आणि उचलून जवळच असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले. याठिकाणी त्यांनी तत्काळ अपघातग्रस्त महिलेला प्रथमोपचार देत पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. 


अपघात झाल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे गोळा झालेल्या जमावाने महिलेची मदत करण्याऐवजी ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यातच धन्यता मानली. मात्र कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता चव्हाण यांनी दाखविलेल्या माणुसकीचे दर्शन या घटनेतून समोर आले. आधीच राज्यात घडलेल्या सचिन वाझे प्रकरणानंतर संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांकडे नागरिक संशयाने पाहत असतानाच उल्हासनगरमध्ये चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि माणुसकीमुळे खाकीची मलीन होत असलेली प्रतिमा काही प्रमाणात का होईना उजळण्यास मदत झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :