सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. ट्वीट करून आमदार पाटील यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवस्मारक उभारण्याची मागणी केली आहे. समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी रुपये वाचतील, आणि त्यातून परिसरात इतर सुविधा देता येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.


अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या घोषणा हवेतच आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील आणि त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देतां येतील. 'शिवसागरात' उभारलेले शिवरायांचे स्मारक हे जगात एकमेवाद्वितीय असेल यात शंकाच नाही. असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.



दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवस्मारक उभारण्याची घोषणा हवेत विरली आहे. राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी आले. मात्र अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न


संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक किर्तीच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न झालं होतं. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेली माती आणि जल शिवस्मारकाच्या नियोजिक ठिकाणी अर्पण केली होती. 


कसं असेल समुद्रातील शिवस्मारक?


अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.


शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यादृष्टीने भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे.


त्या दृष्टीने सरकारच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.