कल्याण : कैदी भर न्यायालयात वकिलाला मारहाण धमकी दिल्याचे अनेक प्रकार सिनेमात पाहिलेत. पण असाच काहीसा प्रकार कल्याण न्यायालयात प्रत्यक्षात घडलाय. झालं असं की, हत्येच्या गुन्ह्यात आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आलं. त्यावेळी या कैद्यानं वकिलाला मारहाण केली. हा कैदी एवढ्यावरच थांबला नाहीतर, त्यानं हा हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है, तुला खल्लास करेन, मी वाघाचा बच्चाय, अशी धमकीही दिली. 


हत्येच्या गुन्ह्यात आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आकाश तावडे या कैद्याला सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात आणले होते. न्यायालयातील सुनावणीदरम्यान संतापलेल्या कैदी आकाशनं वकिलाला मारहाण केली. हा कैदी इथेच थांबला नाही तर त्याने, 'हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है, तुला खल्लास करेन, मी वाघाचा बच्चा आहे', अशी फिल्मी स्टाईल धमकी दिली. या प्रकरणी सरकारी वकिलानं महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ येथे राहणारा आकाश तावडे हा हत्येच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुन्ह्याच्या अंतिम सुनावणीसाठी बुधवारी त्याला कारागृह पोलिसांनी न्यायालयात आणले होते. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ॲड. योगेंद्र पाटील म्हणून काम पाहत आहेत. न्यायालयात न्यायाधीशासमोर आकाश तावडेवर पोलिसांनी दाखल आरोप पत्रावर सुनावणी सुरु केली. अंतिम निकाल देण्यापूर्वी न्यायालयानं आकाशला उद्देशून या गुन्ह्यात तुम्हाला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, यावर तुमचे म्हणणे काय आहे? हे बुधवारी ऐकले जाईल असं सुनावलं. याच दरम्यान संतापलेला कैदी आकाश तावडे कठड्यातून बाहेर आला आणि त्याने सरकारी अभियोक्ता योगेंद्र पाटील यांना मारहाण केली. यावेळी या कैद्यानं ही तर सुरुवात आहे, असं सांगून फिल्मी स्टाईलनं तुला जीवे ठार मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी यांच्या समोर हा प्रकार घडल्यानं सरकारी कामात अडथळा, धमकी दिल्याप्रकरणी सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :