नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्रात पहिला आणि देशात तिसरा नंबर मिळवणाऱ्या नवी मुंबई (Navi Mumbai) शहराला सध्या डेंग्यू (Dengue )आणि मलेरिया (Malaria) साथीने ग्रासले आहे. शहरात डेंग्यूचे रूग्ण वाढत असून यामुळे मृत्यूही होत आहेत. कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलेल्या मनपाला साथीचे रोग थांबविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.  यामुळेच सध्या शहरात 300 पर्यंत डेंग्यू सदृश्य रूग्ण आले असून यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मनपा आरोग्य विभाग आकडेवारी लपवण्यात धन्यता मानत आहे. 


वाशी येथे राहणाऱ्या सार्थक म्हात्रे या 17 वर्षाच्या युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वयात आलेल्या मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याने म्हात्रे कुटूंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. सार्थक म्हात्रेवर मनपा रूग्णालय आणि फोर्टीज हॉस्पीटल मध्ये उपचार करण्यात आले. मात्र डेंग्यूमुळे पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूमुळे मृत्यू होवू लागल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. एकीकडे कोरोनाचे भूत मानगुटीवर बसले असताना दुसरीकडे जर डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगाने मृत्यू होवू लागल्यास करायचे काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. 


महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करोडो रूपयांची फवारणी करण्याचे टेंडर काढली आहेत.  प्रत्येक नोडसाठी टेंडरपोटी करोडो रूपये खर्च केले जात असूनही फवारणी योग्यरित्या केली जात नसल्याने  डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. महिन्याला मनपा 1 करोड रूपये औषध फवारणीसाठी खर्च करते. दुसरीकडे साचलेले पाणी काढले जात नसल्याने त्यात डेंग्यूच्या आळ्या तयार होऊन मच्छरांची पैदास होत आहे. याचाच परिणाम म्हणजे  डेंग्यू, मलेरियाचा फैलाव वाढल्याने लोकांचा जीव जाऊ लागला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याने प्रत्येक विभागात फवारणी करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. 


शहरातील गावठाण आणि झोपडपट्टी भागात याचे प्रमाण जास्त आहे. अस्वच्छता आणि साठलेल्या पाण्यामुळे सध्या मनपा रुग्णालयात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रूग्ण दाखल होऊ लागले आहेत. नवी मुंबईत 300 पर्यंत डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळले असून खाजगी रुग्णालयातील आकडेवारी मिळवली जात नाही. तसे केल्यास हा आकडा मोठा होत असल्याचा आरोप माजी आरोग्य समिती सभापती राजू शिंदे यांनी केला आहे.  दरम्यान याबाबत मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.