Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावर (Kalyan Dombivli Road potholes) पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वच थरातून टीकेची झोड उठवली जात आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर गणेशोत्सवापूर्वी (Ganesh Utsav 2022)  खड्डे भरण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान पेव्हर ब्लॉक, खडी, मुरुम, कोल्ड मिक्स याद्वारे खड्डे भरले जात असले तरी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडू लागल्याने आता एका सीमेंट कंपनीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर रॅपिड कॉंक्रिटचा (rapid concrete)प्रयोग करण्यात आला आहे.
 
कसे भरणार खड्डे 


रस्त्यावर पडलेले खड्डे आणखी खोदून त्यात सिमेंट, खडी यासह विविध प्रकार मिसळून तयार केलेल्या मिश्रणाचा थर दिला जातो. जिथे सामान्य कॉंक्रिट सेट होण्यासाठी 4 ते 5 तासाचा कालावधी लागतो तिथे या रॅपिड कॉंक्रिटचे मिश्रण खड्ड्यात पडल्यानंतर 40 मिनिटात ते सेट होते तर 4 ते 5 तासात त्यावरून वाहतूक सुरु करणे शक्य होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या रॅपिड कॉंक्रिटचा प्रयोग पालिकेच्या वतीने 90 फुटी समांतर रस्त्यावरील खड्ड्यावर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरात या पद्धतीने खड्डे भरले जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.


कल्याण डोंबिवलीतील नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं त्रासलेले आहेत. आता या नव्या प्रयोगानं खड्ड्यांपासून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षा कल्याण डोंबिवलीकर करत आहेत. 


गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम 


गणेशोत्सवाच्या काळात कल्याण डोंबिवली शहरातील कचरा समस्या भीषण होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी गणेशोत्सव काळात कचरा समस्या निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याचे सांगितले. शहरात कोठेही कचऱ्याचे ढिगारे राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर घरोघरी कचरा गोळा करून हा कचरा थेट प्रक्रियेसाठी प्लांट मध्ये नेला जाईल. एकत्रित मोहीम राबवीत शहरातील कचरा प्रश्न सोडविला जाणार असल्याचे आश्वासन आयुक्त डॉ दांगडे यांनी दिले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


Western Expressway Traffic : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा


Kolhapur-Sangli Highway : कोल्हापूर सांगली रस्त्याची अक्षरश: चाळण, संतप्त ग्रामस्थांचा रुकडीजवळ रास्ता रोको