मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) वाहतूक कोंडी झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेला वाकोला उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे भरण्याचा काम आज सकाळपासून सुरू असल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हाईवेवर अंधेरीच देशाने जाणारा मार्गावर वाकोला ते माहिम दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांना थांबावं लागत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये काही रुग्णवाहिका सुद्धा अडकल्याचे दृश्य मध्ये पाहयला मिळत आहे. वेस्टन एक्सप्रेस हायवेवर झालेली या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. अंधेरीच्या दिशेने येत असलेल्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
या द्रुतगती महामार्गावर कायमच वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. सकाळच्या वेळी 9 ते 11 च्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. संध्याकाळी 4 नंतर देखील तीच परिस्थिती असते. संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्याने अनेक नोकरदारवर्ग घरी जाण्याच्या तयारीत असतात. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनाला तातडीनं खड्डे भरा हा पहिला आदेश दिला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिलाच आदेश अजुनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईच्या रस्त्यांवर तर खड्ड्यांची नक्षी वेगानं विस्तारत आहे अनेक ठिकाणचे खड्डे मृत्यूचे सापाळे ठरत आहेत.
2014 ते 2019 या कालावधीत खड्ड्यामुळे 150 लोकांचा मृत्यू
कफ परेड, कुलाबा, वाकोला, चेंबूर, खार, जोगेश्वरी पश्चिम, भांडुप, अंधेरी पश्चिम, चर्चगेट, बोरिवली, मालाड, गोरेगाव आणि मानखुर्द यांसारख्या वैविध्यपूर्ण भागात खड्डे दिसून आले. गेल्या 24 वर्षात मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांवर 29,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. यासोबतच कंत्राटदारांच्या देखरेखीच्या अभावामुळे खड्डे हे मुंबईतील रस्त्यांचे कायमस्वरूपी ठिकाण बनले असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन मृत्यूही ओढवला आहे. 2014 ते 2019 या कालावधीत 150 लोकांचा मृत्यू झाला.