ठाणे : कल्याणामध्ये हत्या झालेल्या मोटरमनच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा लोकेश बनोरिया हा जखमी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णालयातून त्याला सोडताच आई आणि वडिलांच्या हत्येप्रकरणी त्याला अटक केली जाईल अशी माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.
कल्याणच्या चिकनघर परिसरात निखिल हाईट्समध्ये सेवानिवृत्त मोटरमन प्रमोद बनोरिया, पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश राहत होते. या सोसायटीतील रहिवाशांनी रविवारी 12 डिसेंबर रोजी दुपारी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना फोनद्वारे बनोरिया कुटुंबातील दोन व्यक्ती जखमी आणि एक जण मृत अवस्थेत असल्याची माहिती दिली. महात्मा फुले चौक पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असता त्यांना प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तर प्रमोद यांची पत्नी कुसुम व मुलगा लोकेश हा जखमी अवस्थेत आढळून आला.
सुरुवातीला लोकेशने वडिलांनी आम्हा दोघांना जखमी केले, त्यानंतर त्यांनी स्वतःला संपवून टाकले असा बनाव केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. मात्र पोलिसांना या प्रकरणी संशय होता. पोलिसांनी लोकेशची अधिक चौकशी केली असता, प्रमोद व त्यांचा मुलगा लोकेश या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती मिळाली. 12 डिसेंबर रोजी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने वार करत त्यांची हत्या केली.
याच दरम्यान, प्रमोद यांना वाचविण्यासाठी मधे पडलेल्या प्रमोद यांची पत्नी आणि लोकेशची आई कुसुमवर देखील त्याने वार केले. तिला देखील जखमी केले. यानंतर स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. पोलिसांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी व आईवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी लोकेश विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, लोकेश व आई कुसुम हे दोघे जखमी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र लोकेशची आई कुसुम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी आता आई आणि वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलगा लोकेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच जखमी लोकेश हा रुग्णालयातून सुटताच त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या :