कल्याण : सुटकेसाठी अवघे पाच दिवस बाकी असताना कैदी जेलमधून पळाला पण अवघ्या 24 तासात पोलिसांनी त्याला पुन्हा पकडलं आणि त्याची पुन्हा कोठडीत 'घरवापसी' झाली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात घडली. मात्र यामुळे कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात राहणाऱ्या राजेंद्र जाधव याला रिक्षा चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशाप्रकारे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना जेलमधली लहानमोठी कामं करण्यासाठी दिली जातात. ज्यांची वागणूक चांगली असेल त्यांना जेलच्या बाहेर आणून जेल परिसराची स्वच्छता, जेलच्या वसाहतीची स्वच्छता अशी कामंही दिली जातात.
अशाच पद्धतीने राजेंद्र जाधव याला गुरुवारी दुपारी जेल वसाहतीच्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी बाहेर काढण्यात आलं. मात्र यावेळी लघुशंकेचा बहाणा करत तो वसाहतीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत गेला. कैद्यांचा युनिफॉर्म काढून ठेवला आणि पळून गेला. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे राजेंद्र याची शिक्षा पूर्ण व्हायला अवघे पाच दिवस बाकी होते. मुलाची आठवण आल्यानं पळून गेल्याची कबूली त्याने दिली आहे.
हा प्रकार लक्षात येताच कारागृह पोलिसांची पाचावर धारण बसली आणि शहर पोलिसांना याची तक्रार करण्यात आली. यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने राजेंद्र जाधव राहत असलेल्या कोळेगाव परिसरात सापळा रचला आणि तिथून शुक्रवारी सकाळी त्याला अटक केली. त्यामुळे पाच दिवसात सुटका होणाऱ्या राजेंद्र याला आता पुन्हा नवीन गुन्ह्याची किमान सहा महिने तरी जास्तीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून यापूर्वीही मागच्याच वर्षी दोन कैदी पळून गेले होते आणि ती घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. तर कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडणे, कैद्यांना गुटखा, तंबाखू, सिगरेट पुरवणे हे प्रकार तर सर्रास होत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा वाऱ्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे कारागृह अधीक्षकांशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता जे जागेवर नसल्याचं सांगण्यात आलं. याकडे वरिष्ठ अधिकारी आता याकडे लक्ष देतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सुटकेसाठी अवघे पाच दिवस बाकी असताना कैदी जेलमधून पळाला, कल्याणच्या कारागृहातला प्रकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2019 10:39 PM (IST)
कैद्यांचा युनिफॉर्म काढून ठेवला आणि पळून गेला. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे राजेंद्र याची शिक्षा पूर्ण व्हायला अवघे पाच दिवस बाकी होते. मुलाची आठवण आल्यानं पळून गेल्याची कबूली त्याने दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -