मुंबई : सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून शरद पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसात चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसमधून कालिदास कोळंबकर, सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल हे देखील भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.  आमदार वैभव पिचड यांच्या भाजपा प्रवेशाच्या हालचालींना वेगाने सुरुवात झाली असून  अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रमुख कार्यकर्त्यांशी वैभव पिचड यांनी याबाबत बैठक घेतली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात चित्रा वाघ, वैभव पिचड आणि  कालिदास कोळंबकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी केल्याचेही कळत आहे. 30 जुलैला राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार वैभव पिचड आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त जयकुमार गोरे, सुनील केदारे, गोपालदास अग्रवाल ही भजप प्रवेशाच्या रांगेत असल्याची सुत्रांची माहिती आहे.



संबंधित बातम्या

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांची विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ  

 चौकशीच्या भीतीने आणि सरकारची मदत व्हावी या हेतूने अनेकजण पक्ष सोडत आहेत : अजित पवार