मुंबई : पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेवर अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. मात्र या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांची असंवेदनशीलता पाहायला मिळाली. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते कोणतीही प्रतिक्रिया न देताच निघून गेले. पत्रकार अजित पवार यांना पांडुरंग रायकर यांच्याबाबत प्रश्न विचारत राहिले, मात्र काही मिनिटं थांबून प्रतिक्रिया देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही.


टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं आज (2 सप्टेंबर) सकाळी कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.


पांडुरंग रायकर यांच्या निधनावर पत्रकारांपासून राजकीय नेते भावना व्यक्त करत आहेत, श्रद्धांजली वाहत आहेत. परंतु पुण्यातील कोरोना परिस्थितीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचं वेळीच उपचार न मिळाल्याने कोरोनामुळे निधन होणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याविषयी पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची प्रतिक्रिया पत्राकारांनी विचारली. परंतु एरव्ही पत्रकारांपासून हटकून असणारे, वेळ पडल्यास पत्रकारांच्या माईकवर सॅनिटायझर फवारुन मीडियाशी संवाद साधणारे अजित पवार कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकाराच्या मृत्यूवर कोणतंही भाष्य न करता निघून गेले.


अॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही
खरंतर पांडुरंग रायकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झालेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. परंतु इथे सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. एकीकडे पांडुरंग रायकर यांची ऑक्सिजन पातळी खालावत होती, तर दुसरीकडे व्हेंटिलेटरची सुविधा असलेली कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स न मिळत नव्हती. या सगळ्या गोंधळात वेळ निघून गेली आणि पांडुरंग रायकर यांनीही प्राण सोडले.


काम अपूर्ण असतानाही पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचं उद्घाटन
पुण्यातील बहुचर्चित जम्बो कोविड केअर सेंटरचं उद्घाटन रविवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या कोविड केअर सेंटरचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने दोन जम्बो कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. त्यातील एक पुण्यात तर दुसरे पिंपरी चिंचवड शहरात आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये 800 बेड आहेत. यामध्ये 600 बेड ऑक्सिजन तर 200 बेड हे व्हेंटिलेटर असणार आहेत.


पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करणार
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, "या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले हे दुर्देवी आहे. याचं समर्थन नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ही सुविधा मोफत देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्यांना सांगितलं आहे. तरीही अशा घटना घडत आहेत जे दुर्देवी आहे. पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करु तसेच माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ."


पत्रकाराच्या मृत्यूनंतर राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा : किरीट सोमय्या
"पांडुरंग रायकर यांचा बळी सरकारी यंत्रणेच्या अव्यवस्थेने घेतला आहे. हायकोर्टाने अर्धा तासाच्या आत अॅम्ब्युलन्स पोहोचली पाहिजे असे आदेश दिले असताना, अॅम्ब्युलन्सअभावी जीव जात आहेत. हा कोर्टाचा अवमान आहे. कोविडवर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. उद्धव ठाकरेंना कोरोनाची ग्राऊंड रिअॅलिटी अजून कळलेलीच नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे फक्त टीव्हीवर बाईट देत आहेत, वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबईत आयसीयू बेड्स उपलब्ध नाहीत. आरोग्य मंत्री पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. राजेश टोपे यांनी पत्रकाराच्या मृत्यूनंतर तात्काळ राजीनामा द्यायला हवा, तर उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडून परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा," अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या




पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्यूसंदर्भात उपमुख्यमंत्र्याची असंवेदनशीलता; मृत्यूवर बोलणं टाळलं

Pandurang Raikar | वार्ताहर पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन; योग्य उपचार न मिळाल्याने निधन