मुंबई : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. त्यातच मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.


मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या 6574 होती, ती 7709 वर गेली. ही वाढ केवळ 14 टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत 37,528 इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 इतकी झाली. ही वाढ 42 टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात 18.44 टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक आहे.


Corona Update | खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ


देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे आहे. भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (1584), आंध्र (1391), दिल्ली (950), तामिळनाडू (847), आसाम (748), कर्नाटक (740), बिहार (650), तेलंगाणा (637), उत्तराखंड (590), हरियाणा (563) इतकी आहे. भारताची सरासरी 545 इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (4.18 टक्के), उत्तरप्रदेश (4.56 टक्के), पंजाब (4.69 टक्के), मध्यप्रदेश (4.74 टक्के), गुजरात (5.01 टक्के), बिहार (5.44 टक्के), हरियाणा (5.51 टक्के), ओरिसा (5.71 टक्के), झारखंड (6.19 टक्के), गोवा (8.05 टक्के), तामिळनाडू (8.10 टक्के), भारताचा 8.57 टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर 19.15 टक्के इतका आहे.


अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्‍यात खाटांची क्षमता अधिक वाढवणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करुन देणे, अशा सूचनांचा यात समावेश आहे.