जेट एअरवेजच्या विमानात भांडणाऱ्या वैमानिक दाम्पत्याचं निलंबन
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2018 11:23 PM (IST)
डीजीसीएने पुरुष वैमानिकाचा उड्डाण परवाना रद्द केला आहे.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : हजारो फूट उंचावर विमानात भांडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पायलट पती-पत्नीचं निलंबन करण्यात आलं आहे. 1 जानेवारीला लंडनहून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील कॉकपिटमध्येच पायलट दाम्पत्यात वाद रंगला होता. '1 जानेवारी 2018 रोजी 9W119 लंडन-मुंबई या विमानात घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही कॉकपिट क्रूची सेवा तातडीने निलंबित करण्यात आली आहे' असं जेट एअरवेजने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. डीजीसीएने पुरुष वैमानिकाचा उड्डाण परवाना रद्द केला आहे. काय आहे प्रकरण? 1 जानेवारीला संबंधित वैमानिक पती-पत्नी जेट एअरवेजचं 9W119 लंडन-मुंबई विमान चालवत होते. त्यावेळी दोघांमध्ये घरगुती कारणावरुन वाद रंगला आणि पतीने अचानक पत्नीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे महिला वैमानिक कॉकपिटमधून रडत बाहेर आली. पायलटच्या डोळ्यात अश्रू पाहून केबिन क्रूही आश्चर्यचकित झाले. पुरुष वैमानिकाने आपल्याला कानशिलात लगावल्याचं तिने सांगितलं. तिच्या पाठोपाठ पुरुष वैमानिकही तिची समजूत काढण्यासाठी बाहेर आला आणि क्षणभरात सर्वांचे धाबे दणाणले. कॉकपिटमध्ये काही कालावधीसाठी पायलट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्वांच्या मनात भीती चमकून गेली.