मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबई महापालिकेनं दणका दिला आहे. अंधेरीत जुहू भागातील सिन्हा यांच्या 'रामायण' या घरातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीने हातोडा लगावला आहे.


मुंबई महापालिकेने शत्रुघ्न सिन्हांच्या घरातीलल अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये घराच्या गच्चीवरील अनधिकृत टॉयलेट, देवघर आणि ऑफिसचा समावेश आहे. एमआरटीपी कायद्या अंतर्गत एक महिन्यापूर्वी सिन्हा यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न हटवल्यामुळे महापालिकेनं ही कारवाई केली.

'सरकार घराच्या आत शौचालय बांधण्याला प्रोत्साहन देत आहे. घरात काम करणाऱ्यांना वापरता यावं, यासाठी आम्ही गच्चीवर टॉयलेट बांधलं होतं. मात्र बीएमसीने ते हटवलं. माझा याला आक्षेप नाही. तूर्तास आम्ही देवघर अन्यत्र हलवलं आहे, मी पालिका अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहे. मी सत्याच्या राजकारणाची किंमत चुकवत आहे का, हे माहित नाही.' अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न यांनी दिली.

यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या गोरेगावमधील बंगल्यात अवैध बांधकाम असल्याचा आरोप झाला होता. तर कॉमेडियन कपिल शर्मा आणि अभिनेता इरफान खान यांच्या घरातील अनधिकृत बांधकामावरही पालिकेने हातोडा मारला आहे.