मुंबई : 'जेडे हत्याकांड प्रकरणी पत्रकार जिग्ना व्होराविरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत' असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयची याचिका फेटाळून लावली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने याप्रकरणी दिलेल्या जिग्नाच्या दोषमुक्तीला कायम ठेवल्याने जिग्ना व्होराला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणातील दुसरा आरोपी पॉलन्स जोसेफच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून आव्हान मात्र अजूनही कायम आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठापुढे यावर आज सुनावणी झाली.


काय आहे जेडे हत्याकांड प्रकरण
11 न 2011 रोजी एका इंग्रजी दैनिकाचे जेष्ठ पत्रकार जोतिर्मय डे यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना व्होरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

छोटा राजन विरोधात महाराष्ट्रात एकूण 70 गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये जे. डे यांच्या हत्येचाही समावेश होता. राजनचा ताबा सीबीआयकडे असल्याने हे प्रकरणही तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले आणि तशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा अंतिम निकाल सुनावताना पुराव्यांअभावी कोर्टाने जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्त केले होते. तर छोटा राजनसह अन्य मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या यादीत साक्षीदार असलेला रवी राम हा सीबीआयच्या आरोपपत्रात आरोपी दाखवण्यात आला आहे. रामने राजनच्या सांगण्यावरून पॉल्सनमार्फत 20 परदेशी सिमकार्ड मारेकऱ्यांना पुरवल्याचा सीबीआयचा आरोप आहे. तसेच जे. डे यांची माहिती राजनला दिल्याचा आरोप असलेली पत्रकार जिग्ना व्होरा व राजन यांच्यात झालेले संभाषणही सीबीआयच्या आरोपपत्रात आहे. फॉरेन्सिक लॅबने या दोघांच्या आवाजाचे नमूने तपासले असून संभाषणातील आवाज त्यांचाच असल्याचा अहवाल दिला आहे. आरोपपत्रात राजनसह इतर आरोपींवर हत्या, हत्येचा कट, शस्त्र प्रतिबंधक कायदा व मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.