मुंबई: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू मुंबई दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात शलोम या बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. नेतन्याहू यांनी बॉलिवूड ताऱ्यांसोबत सेल्फीही काढला. तसंच त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्ते अशी केली, तर भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल असा केला.



या कार्यक्रमावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता अभिषेक बच्चन, दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर, अनुराग कश्यप, इम्तीयाज़ अली, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष गीतकार प्रसून जोशी आणि गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात ऐश्वर्या, यूटीव्ही सीईओ रोनी स्क्रूवाला आणि करण जोहर यांनी पुष्पगुच्छ देऊन नेत्यान्याहू आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं.


बॉलिवूडचं कौतुक

नेत्यान्याहू यांनी आपल्या छोट्याशा भाषणात बॉलिवूडचं कौतुक केलं. संपूर्ण जग बॉलिवूडवर प्रेम करतं. इस्रायल आणि मला स्वत:ला बॉलिवूड आवडतं, असं नेत्यान्याहू म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची हजेरी

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. भारतीय सिनेमे जगभरात प्रसिद्ध आहेत, जगभरात त्यांना पसंती मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.