कल्याण : कल्याणजवळच्या टिटवाळ्यात इंजिनियर तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी अखेर टिटवाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. मितेश जगताप असं या तरुणाचं नावं असून त्याने 23 ऑगस्ट 2017 रोजी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा त्याच्या कुटुंबाचा आरोप होता.
मितेश जगताप.. कल्याणजवळच्या टिटवाळ्यात उच्चशिक्षित चौकोनी कुटुंबात राहणारा आणि स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर असलेला तरुण. अवघ्या 21 वर्षांचा असलेल्या मितेशने 23 ऑगस्ट 2017 रोजी आत्महत्या केली होती. मात्र या आत्महत्येला पोलिसच जबाबदार असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप होता.
20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री मितेश टिटवाळ्यात मोटारसायकल घेऊन फिरत होता, मात्र मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणलं. घरच्यांनी गाडीची कागदपत्रं आणून दाखवल्यावर त्याला सोडण्यात आलं. मात्र त्याचा मोबाईल पोलिसांकडे होता, हा मोबाईल देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा, तसंच मितेशला चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाचेची मागणी केल्याचा मितेशच्या कुटुंबियांचा आरोप आहे. यातूनच मितेशने 23 ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याला पोलिसच जबाबदार असल्याचा जगताप कुटुंबाचा आरोप आहे. मात्र याप्रकरणी वारंवार मागणी करुनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे अखेर जगताप कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई आणि कुलाबावाला यांच्या खंडपीठाने पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी प्रकरणाच्या आदेशाचा दाखला देत न्यायालयाने हे आदेश दिले. त्यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे आणि पोलीस नाईक अनिल राठोड यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र याप्रकरणी अद्याप त्यांच्यावर साधी निलंबनाची कारवाईही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलीस दल आरोपी पोलिसांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मितेशच्या आईने केला आहे. तसंच या दोघांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्यावरही गुन्हा दाखल करुन सर्वांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी मितेशची आई पुष्पा जगताप यांनी केली आहे.
या सगळ्या प्रकरणाबाबत टिटवाळा पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र जगताप कुटुंब फक्त आरोप करत असून त्यांच्याकडे काहीही पुरावे नाहीत, त्यामुळे आमच्या पोलिसांची निर्दोष मुक्तता होईल, असा छातीठोक दावाही पोलीस करत आहेत. त्यामुळे आता न्यायालयात या प्रकारणाचं काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मितेश जगताप आत्महत्याप्रकरणी अखेर पोलिसांविरोधात गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2018 08:12 AM (IST)
अवघ्या 21 वर्षांचा असलेल्या मितेशने 23 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. मात्र या आत्महत्येला पोलिसच जबाबदार असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -