मुंबई : तुमचं शहर राहण्यायोग्य आहे का? शहराच्या सुविधांबाबत तुमचं मत तुम्हाला प्रशासनाकडे थेट पोहोचवायचं असेल तर एक चांगली संधी आहे. राहणीमान निर्देशांक सर्वेक्षणाअंतर्गत सर्वोत्तम शहरांचं सर्वेक्षण सध्या सुरु आहे. या सर्वेक्षणामध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे शहरातल्या नागरिकांचं मत नोंदवलं जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये रोजच्या जगण्याशी निगडीत सेवांविषयीचे प्रश्न म्हणजे शिक्षण, आरोग्य, आपातकालीन सेवा, वीज पुरवठा, करमणूक, मोकळ्या जागा यांविषयीचे प्रश्न आहेत. सर्वेक्षणात मत नोंदवण्यासाठी 29 फेब्रुवारी ही शेवटची तारिख आहे. या सर्वेक्षणामध्‍ये भाग घेण्‍याकरिता http://eol2019.org/Citizenfeedback या लिंकवर आपलं मत नोंदवायचं आहे. मुंबई शहराकरिता सर्व मुंबईकरांनी http://eol2019.org/Citizenfeedback पोर्टलवर "ग्रेटर मुंबई" ला मतदान करण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे.


गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणामध्ये पुणे हे राहण्यायोग्य शहर म्हणून पहिल्या क्रमांकानं घोषित झाले तर मुंबईचा क्रमांक तिसरा होता. दुसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई हे शहर होते. या सर्वेक्षणात मत नोंदवण्यासाठी शेवटचे दोन-तीन दिवसच शिल्लक आहेत. मात्र महापालिका प्रशासनानं इतर शहरांच्या तुलनेत या सर्वेक्षणासाठी मुंबईकरांनी मत नोंदवावं यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. आतापर्यंत सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईतून केवळ 14 हजार मुंबईकरांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. या सर्वेक्षणात असलेले प्रश्न पाहाता आणि आतापर्यंतचं तोकडं मतदान पाहाता मुंबईचा क्रमांक यावेळच्या सर्वेक्षणात आणखी घसरेल की वधारेल याबाबत प्रश्न आहे.


याबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "या सर्वेक्षणात जास्तीत जास्त मुंबईकरांनी सहभागी व्हायला हवं. मुंबईत अनेक सोयीसुविधा आहेत. मुंबई प्रगतीपथावर आहे त्यामुळे, सर्वेक्षणात यंदा मुंबई वरच्या क्रमांकावर असण्याची अपेक्षा आहे. मुंबईकरांनी मुंबईसाठी मतदान करायला हवं. शेवटची मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईच्या मतदानाचा आकडा सध्या तरी कमी आहे. शेवटच्या दिवसांत जास्तीत जास्त मतदान व्हावं ही अपेक्षा आहे. मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी नगरसेवकही प्रयत्न करणार आहेत."


या सर्वेक्षणामध्‍ये खालील प्रश्नांबद्दल नागरिकांना आपले मत नोंदवायचे आहे.




  1. आपल्या मुलांसाठी चांगल्या प्रतीचे शिक्षण मुंबई शहरात परवडणारे आहे?

  2. आपल्या शहरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळवणे परवडणारे आहे?

  3. आपल्या शहरात घर भाडे/घर परवडणे परवडणारे आहे?

  4. आपल्या शहरातील स्वच्छतेच्या स्थितीशी तुम्ही किती संतुष्ट आहात?

  5. आपल्या परिसरातील कचरा गोळा करण्याची व्यवस्था किती चांगली आहे?

  6. आपल्या शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचे तुम्ही कसे मूल्यमापन कराल?

  7. शहरात तुम्हाला किती वेळा पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो?

  8. शहरात प्रवास करणे सुरक्षित आहे?

  9. शहरात प्रवास करणे तुम्हाला किती सोपे वाटते?

  10. शहरात प्रवास करणे किती परवडणारे आहे?

  11. तुमचे शहर राहण्यासाठी सुरक्षित आहे ?

  12. शहरातील आपात्कालीन सेवा जसे अग्निशामक दल आणि अॅब्युलन्स, च्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन कसे कराल?

  13. शहरातील सार्वजनिक ठिकाणे महिलांसाठी किती सुरक्षित आहेत?

  14. शहरात पार्क, सिनेमा आणि थिएटर हॉल सारख्या मनोरंजनाच्या सुविधांच्या उपलब्धतेशी तुम्ही किती संतुष्ट आहात?

  15. शहर त्या लोकांनी खुप संधी देते जे उपजीविका मिळवण्याच्या शोधात आहेत?

  16. शहरात राहण्याच्या खर्चाचा विचार करता, तुम्हाला वाटते की योग्य दर्जाचे जीवनासाठी तुमचे घरगुती उत्पन्न योग्य आहे?

  17. शहरातील इंशुरन्स, बँकिंग आणि एटीएम, आणि क्रेडिट यासारख्या विभिन्न आर्थिक सेवा वापरण्याच्या सोपेपणाशी तुम्ही किती संतुष्ट आहात?

  18. शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे का?

  19. शहरातील हिरवळीच्या प्रमाणाशी तुम्ही किती संतुष्ट आहात?

  20. शहरातील वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेशी तुम्ही किती संतुष्ट आहात?

  21. शहरात परवडणारा/ किफायतशीर वीज पुरवठा मिळतो का?