मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप विविध मुद्द्यांवरुन आक्रमक झाली आहे. यामध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. मात्र भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर भाजपच्याच एका नगरसेविकेने गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे पीडित नगरसेविकेने याबाबत भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याकडे त्यांनी दर्लक्ष केलं. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहतांवरील आरोपांमुळे भाजपची अधिवेशनादरम्यान कोंडी होण्याची शक्यता आहे.


भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबियांना जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप नीला सोन्स यांनी केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय न मिळल्याने नीला यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. नीला सोन्स यांनी आमदार नरेंद्र महेतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन केलं होतं. हा व्हिडीओ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवून देखील दखल न घेतल्यानं नीला सोन्स नाराज होत्या. अखेर त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. नीला सोन्स या मीरा-भाईंदरमधील प्रभाग क्रमांक 10 अ च्या नगरसेविका आहेत.



दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मेहता यांचा राजीनामा


नरेंद्र मेहता यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या जबाबदारीचा राजीनामा देत, राजकीय संन्यास घेतला होता. मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपचे विद्यमान आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा असे दोन गट होते. वरिष्ठ नेत्यांकडून मेहता गटाला महापौर पदासाठी नाकारण्यात आलं, त्यामुळे ते नाराज झाले होते अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. माझ्यामुळे भाजपची बदनामी होत आहे. त्यामुळे पक्षाच्या सर्व जबाबदारीचा राजीनामा देत असल्याच नरेंद्र मेहता यांनी सांगितलं होतं. मात्र नीला सोन्स यांच्या आरोपांनंतर नरेंद्र मेहता पुन्हा चर्चेत आले आहेत.