International Yoga Day In Mumbai: मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवारी 21 जून रोजी मुंबई महानगरातील 24 वार्डातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 


बृहन्मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
  
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या संकल्पनेत शारीरिक स्वास्थासह मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यालाही महत्त्व दिले आहे. सद्यस्थितीत रोजच्या दैनंदिन कामातील धावपळ व ताणतणावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार तसेच नैराश्य यासारखे जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सन 2022 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विभाग स्तरावर मोफत शिव योगा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागात एकूण 131 शिव योग केंद्र कार्यरत असून, सध्या 6163 लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच जून 2022 पासून ते आजपर्यंत एकूण 15 हजार 77 लाभार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून यंदा योग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीच्या आंतराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना "मानवतेसाठी योग" ही आहे. विभाग स्तरावरील शिव योग केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग विषयी माहिती व निरोगी आयुष्याबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता सर्व विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी योग प्रशिक्षण संस्थांसोबत समन्वय साधून आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत. 


उत्तम शारीरिक व मानसिक स्वस्थ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2019 मध्ये फिट इंडियामूव्हमेंट  सुरू केली आहे. कोविड महामारीच्या विळख्यातून सुटल्यानंतर भारताच्या ‘फिट इंडिया’ या राष्ट्रीय अभियानाला अनुसरून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘फिट मुंबई’ हा उपक्रम सुरू केला आहे. मुंबईकरांमध्ये आरोग्य आणि तंदुरूस्तीबाबत जनजागृती करणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे ही अभियानामागील बृहन्मुंबई महानगरपालिकेची संकल्पना आहे. या संकल्पना अंतर्गत यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी बृहन्मुंबई महानगरपालिका ‘फिट मुंबई’ हा उपक्रम राबविणार आहे. 


असा आहे ‘फिट मुंबई’ उपक्रम 


जे नागरिक चालत नाही त्यांना चालण्यासाठी, जे चालतात त्यांना धावण्यासाठी आणि धावणाऱ्यांना अधिक वेगाने धावण्यासाठी प्रोत्साहित करुन जागरूकता निर्माण करणे हे ‘फिट मुंबई’ उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच नागरिकांना फक्त धावण्याची सवय लावणे नव्हे तर नियमितपणे 30 ते 40 मिनिटे काही शारीरिक व्यायाम करण्याची सवय लावणे असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त तथा 'फिट मुंबईचे' प्रमुख समन्वयक श्री. विश्वास मोटे यांनी सांगितले.


डिसेंबरमध्ये होणार हाफ मॅरेथॉन


‘फिट मुंबई’ या अभियानाचा एक भाग म्हणून डिसेंबर 2023 मध्ये ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ उपक्रम घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नियोजन आहे. तसेच मुंबईकरांसाठी माहिती (Information), शिक्षण (Education) आणि संवाद (Communication) उपक्रमही राबविण्यात येणार आहे. तसेच कार्यरत असलेल्या शिव योग केंद्रांच्या माध्यमातून सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी  योग, ध्यान, प्राणायाम शिकविण्यात येणार आहे. याशिवाय वॉकेथॉन, प्लॉगॅथॉन, श्रमदान आदींच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आणि विविध स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


'फिट मुंबई’ चा प्रोमो रन यशस्वी


17 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘प्रोमो रन’ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे पाच हजार मुंबईकरांनी सहभाग घेतला. तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘बीएमसी हाफ मॅरेथॉन’मध्ये सुमारे 12 हजारांहून अधिक मुंबईकर सहभागी होतील, असा अंदाज आहे. 


सहा महिने विविध उपक्रम


जुलै महिन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिव योग केंद्रांसह योगथॉन आयोजित करणे, ऑगस्ट महिन्यात बृहन्मुंबईमहानगर पालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात नागरिकांची  वैद्यकीय तपासणी  करणे, सप्टेंबर महिन्यात वॉर्डनिहाय विविध गटांच्या धावण्याचे सरावात्मक उपक्रम आयोजित केला आहे. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात वॉकथॉन/प्लॉगेथॉनच्या माध्यमातून महानगरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.