Mumbai News:  चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतही 18 ते 69 वर्ष या वयोगटातील सुमारे अठरा टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष 2021 मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी 14 टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे. या बाबी लक्षात घेता महानगरपालिकेने व्यापक स्तरावर आरोग्य चाचणी आणि जनजागृती सारखे उपक्रम हाती घेतली असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.


दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिन 2021-2023 निमित्ताने मधुमेह देखभालीसाठी आरोग्य सेवांपर्यंत पोहोच ही संकल्पना जगभरात राबवली जात आहे. यंदा (2022) मध्ये देखील मधुमेह संदर्भातील गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित करून सर्वत्र अभियान राबविण्यात येत आहे.


आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation, IDF) या संस्थेच्या सन 2021 च्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक सात मधुमेही रुग्णांपैकी एक रुग्ण हा भारतीय आहे. आपल्या देशातील राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण 2019-2020(National Family Health Survey - NFHS) नुसार, पंधरा वर्षे वयावरील निकष लक्षात घेता मुंबईत सुमारे सतरा टक्के महिलांमध्ये तर अठरा टक्के पुरुषांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण (random sugar) 140 मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक आढळले आहे. 


त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेने मुंबईमध्ये 2021मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, 18 ते 69 वर्ष या वयोगटातील सुमारे अठरा टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने 2021 मध्ये केलेल्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार (Civil Registration System) एकूण मृत्यू नोंदणीपैकी 14टक्के मृत्यूचे कारण मधुमेह असे नोंदवण्यात आले आहे. ही सगळी आकडेवारी आणि परिस्थिती लक्षात घेतली तर अत्यंत व्यापक स्तरावर लोकांची आरोग्य तपासणी करण्याची जनजागृतीची देखील गरज अधोरेखित होते.


दर महिन्याला सुमारे 50 हजार रुग्ण मधुमेहासंदर्भातील उपचार घेत


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये मधुमेह संदर्भातील प्राथमिक चाचणी आणि निदान करण्याच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत आणि दर महिन्याला सुमारे 50 हजार रुग्ण मधुमेहासंदर्भातील उपचार घेत आहेत. तीस वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरीत्या चाचणी करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या १५ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट 2022 पासून असंसर्गजन्य आजार केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत 32 हजार 96 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी सुमारे 12 टक्के व्यक्तींचा रक्तदाब हा सामान्य पातळीपेक्षा अधिक आढळला आहे तर रक्तातील साखरेचे प्रमाण (random sugar) 140 मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींचे प्रमाण सुमारे 11 टक्के आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या दोन्ही गोष्टी सामान्य पातळीपेक्षा अधिक असलेल्यांची संख्या देखील ५ टक्के आढळली आहे. या बाबी आढळल्यानंतर या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने महिला वर्गासाठी 26 सप्टेंबर 2022 पासून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान देखील सुरू केले आहे. आजपर्यंत, या अभियानामध्ये 30 वर्षे पेक्षा अधिक वयाच्या १ लाख ०३ हजार ४२० महिलांची मधुमेह विषयक तपासणी केली  आहे. यातील 7 हजार 475 महिलांना मधुमेह असल्याचे निदान झाले आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने अमेरीकेअर संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील सहा विभागांमध्ये 'असंसर्गजन्य आजार दिशा' हा घरोघरी सर्वेक्षणाचा उपक्रम राबवला आहे. यामध्ये तीस वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या दृष्टीने प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे. एफ-उत्तर, एच-पूर्व, के-पूर्व, पी-उत्तर, एम-पूर्व आणि एल या सहा विभागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात एका वर्षात १ लाख ८३ हजार ६८२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. पैकी, उच्च रक्तदाबाचे ६ हजार ६३२ तर मधुमेहाचे ४ हजार ५४० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्याशी देखील संपर्क साधून उपचार सुरू करण्यात आले आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने भारतीय आहारतज्ञ संघटना (Indian Dietician Association) यांच्या सहकार्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना आहार विषयक सल्ला देण्याची/ समुपदेशन सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यातून मागील एक वर्षात २४ हजार २३० रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली बदल संदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे.


दरम्यान, येत्या डिसेंबर २०२२ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका / आशा सेविका यांच्या सहकार्याने लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षे वयावरील व्यक्तींची उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात येतील. सदर आरोग्य चाचणी सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिक, प्रसार माध्यमे, बिगर शासकीय संस्था, खाजगी संस्था, कॉर्पोरेट यांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे. तसेच मुंबईकर नागरिकांनी आपल्या नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यांमध्ये तसेच रुग्णालयांमधील असंसर्गजन्य आजार केंद्रांमध्ये जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब या दोन्ही गोष्टींची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 


सर्व नागरिकांनी दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, पोषक आहार आणि पुरेशा शारीरिक हालचाली/व्यायाम या बाबींचा अंगीकार करून सदर आजारांचा प्रतिबंध राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. वारंवार लघवीला जाणे, अचानक वजन कमी होत जाणे, थकवा, अतिशय तहान लागणे, अंधुक/अस्पष्ट दिसणे, हात-पाय सुन्न होणे अथवा त्यामध्ये सूज येणे, पायामध्ये जखम (अल्सर) होणे या प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींनी तातडीने नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यांमध्ये अथवा रुग्णालयांमध्ये जाऊन स्वतःची चाचणी करून घेणे आणि आरोग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक व्यापक जनजागृतीच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच अभियान हाती घेतले जाणार आहे. यामध्ये जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर, नभोवाणी (रेडिओ) संदेश, लघुपट यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य माहिती पोहोचवली जाईल.


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी म्हटलं की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक आरोग्य चाचणी, खातरजमा आणि उपचार करून घेण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे २०० दवाखाने आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र / बहुउद्देशीय दवाखाने येथे संपर्क साधावा.


कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं की, नागरिकांनी जीवनशैली विषयक योग्य बदल स्वीकारणे गरजेचे असून त्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या भर दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून एकूण १४९ योगा केंद्र देखील सुरू केले आहेत.


संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी म्हटलं आहे की, मधुमेह असलेल्या व्यक्तींपैकी किमान ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह झाला आहे, हे निदान होईपर्यंत प्रत्यक्षात ठाऊकच नसते. तर ज्यांना मधुमेह आहे, त्यातील अनेक जण नियमितपणे उपचार घेत नाहीत. त्यामुळे आरोग्य विषयक गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहून नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे.