ठाण्याच्या राजकारणात वसंत डावखरे हे मोठं नाव होतं. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. त्यामुळे सर्व निवडणुकांमध्ये डावखरेंना फायदा होत असे. निरंजन हे वसंत डावखरेंचे पुत्र.
स्थानिक राजकारणात जितेंद्र आव्हाडांमुळे डावखरे पिता पुत्र नाराज होते. 6 जून 2016 रोजी विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडले. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाने मदत न केल्यामुळे वसंत डावखरे बिथरले होते.
याबाबत त्यांनी अनेकवेळा पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पवारांनी फोन करुन कान टोचल्यावर गोष्टी तात्पुरत्या शांत होत होत्या. पण नंतर पुन्हा तेच राजकारण सुरु व्हायचं.
विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडल्यानंतर त्यांची तब्येत ढासळली होती. पक्षश्रेष्ठी पक्षातील लोकांना अडवत नाहीत, मग माझ्या पाठी माझ्या मुलाला कसं वागवतील, ही चिंता वसंत डावखरे यांना होती.
वसंत डावखरे हयात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डावखरे यांच्यात तीन बैठका झाल्या. शेवटच्या क्षणी डावखरे रुग्णालयात असताना मुख्यमंत्री त्यांना भेटले, तेव्हा पुढची निवडणूक निरंजन डावखरे भाजपमधून लढवणार, असं ठरलं.
जर वसंत डावखरेंना राष्ट्रवादीमधील लोक पाडू शकतात, तर वसंत डावखरेंनंतर निरंजनला पाडणं कठीण नव्हतं. 4 जानेवारी 2018 रोजी वसंत डावखरे निधन झालं. निरंजन यांना राष्ट्रवादीमध्ये कोणी वाली उरला नाही.
राष्ट्रवादीला धक्का, निरंजन डावखरे भाजपत!
वडिलांच्या मृत्यूनंतर सतत अपमान, अपमानास्पद वागणूक यामुळे निरंजन त्रस्त होते. शरद पवार आणि अजित पवारांकडे दाद मागितल्यानंतरही गोष्टी थांबल्या नाहीत.
वसंत डावखरेंसोबत वाद होते, पण त्यांच्यानंतर किमान मुलाला तरी टार्गेट करायला नको, असं राष्ट्रवादीतील नेत्यांना वाटत होतं. पण कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे निरंजन यांनी सगळ्या आशा सोडल्या.
पदवीधर निवडणुकीबाबत निरंजन डावखरे यांची चर्चा मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही झाली होती. त्यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, पण पदवीधरसाठी शिवसेनेची विशेष तयारी नव्हती.
याउलट पदवीधरसाठी मतदारांची नोंदणी भाजपने नीट केली आहे आणि निरंजन यांनीही तयारी केली होती. राष्ट्रवादीतून विशेष मदत मिळणार नाही, उलट निवडणुकीत पाडू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निरंजन हे प्रसाद लाड यांच्याही संपर्कात होते.
राजीनामा देतानाही शरद पवार आणि अजित पवार यांनी निरंजन यांना थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण निवडणुकीत पक्षांतर्गत वादाला सामोरं जावं लागेल, मदत मिळणार नाही आणि पूर्वानुभव पाहता निरंजन यांनी राजीनामा दिला.