Kirit Somaiya Anticipatory Bail Application in HC : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अटकपूर्व जामीनासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचाव मोहिमेसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सोमय्या यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई सत्र न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका सोमवारी फेटाळून लावली होती. त्या निकालाला सोमय्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांच्यासमोर यावर आज सुनावणी पार पडणार आहे. याप्रकरणी सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांचीही जामीन याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. मात्र त्या निकालाची प्रत संध्याकाळी उशिरनं प्राप्त झाल्यानं आज केवळ किरीट सोमय्या यांच्याच याचिकेवर हायकोर्टात (High Court) सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुढील चार दिवस आलेल्या सलग सुट्यांमुळे हायकोर्टाचं नियमित कामकाज बंद राहील, त्यामुळे अटकेची टांगती तलवार रोखण्यासाठी आजची सुनावणी सोमय्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
दुसरीकडे मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी चौकशीसाठी सोमय्या पिता-पुत्रांना आज हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. मात्र तूर्तास अटकेपासून कोणतंही संरक्षण नसल्यानं ते या चौकशीला हजर राहतील, याची शक्यता जरा कमीच आहे. विक्रांत बचावसाठी गोळा केलेला निधी हा सर्वपक्षांकडनं गोळा करण्यात आला होता. तसेच राजभवनाकडे कोणतंही बँक खात नसल्यानं तो निधी आमच्या पक्षाकडे जमा केला, त्यानंतर त्याचं काय झालं माहिती नाही? अशी भूमिका सोमय्या यांच्यावतीनं मांडण्यात आली आहे. मात्र जर तुम्ही लोकांकडनं निधी गोळा केलात तर ती तुमची जबाबदारी होती की, तो योग्य ठिकाणी जातोय की नाही यावर लक्ष देणं. त्यामुळे तो कुठे याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला आम्ही कोणताही दिलासा देऊ शकत नाही. असं सत्र न्यायालयानं किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केलंय.
काय आहे प्रकरण?
माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे, तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला? त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का? याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.
सोमय्याचा बचावासाठी युक्तिवाद
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या दोन पक्षांमध्ये मोठा राजकिय वाद सुरू आहे. त्यामुळेच या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झाले आहेत, हे जगजाहीर आहे, आणि म्हणूनच हे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे काही वेगळं सांगायला नको. तसेच साल 2013-14 मध्ये गोळा केलेल्या वर्गणीची साल 2022 मध्ये पावती मागणं यावरून तक्रारदाराच्या हेतूवरही सवाल निर्माण होतो, असंही ते म्हणाले. याशिवाय हा मदतनिधी 57 कोटींचा होता, असा जर दावा करण्यात येत असेल तर जर रस्त्यांवर उभं राहून इतका निधी गोळा होऊ शकतो का? असा सवाल उपस्थित करत आपण केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा केला होता, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी कोर्टात केला आहे. किरीट सोमय्यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांनिशी आरोप केले आहेत. त्यानंतर पलटवार करताना "बापबेटा जेल जाएंगे", या आशयाची वक्तव्य गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. त्याच दबावाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे, असा आरोपही सोमय्यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सोमय्या पिता-पुत्र हजर राहणार? INS विक्रांत प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचं चौकशीसाठी समन्स