BJP leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी समन्सही बजावलं आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे काल (मंगळवारी) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं पथक सोमय्यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात धडकलं होतं. त्यानंतर त्यांनी समन्सची प्रत सोमय्यांच्या कार्यालयावर चिटकवली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं किरीट आणि नील सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. हजर न राहिल्यास मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात येत आहे. तर नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्यांनी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
दरम्यान, आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत. आता सोमय्या पिता-पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे आजतरी सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊतांनी काय आरोप केले?
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोमय्या पिता-पुत्रांविरोधात शिवसेना आक्रमक
आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ईशान्य मुंबईमध्ये शिवसैनिकांकडून सोमय्यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमेचं आयोजन करण्यात आलं होतं. एका मोठ्या फ्लेक्सवर आणि पत्रावर नागरिकांकडून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. न्यायालयात केस उभी राहील तेव्हा या स्वाक्षऱ्या न्यायालयात देऊन सोमय्यांवर कारवाईसाठी मागणी करण्यात येणार आहे.